

Asia Cup 2025 Team India
मुंबई : आशिया कप सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवसच उरले आहेत. 2025 च्या आशिया कपचे सामने यूएईमध्ये खेळवले जाणार आहेत. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमव्यतिरिक्त, स्पर्धेचे सामने अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियममध्येदेखील होतील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय संघ यूएईमध्ये पोहोचला असून, संघाने सरावाला सुरुवात केली आहे.
आशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबर रोजी सुरू होईल, तर 10 सप्टेंबर रोजी भारताचा पहिला सामना होईल. गट अ मधील भारताचा पहिला सामना यूएई विरुद्ध होणार आहे.
टीम इंडियाने यूएईमध्ये पोहोचताच सरावही सुरू केला आहे. खेळाडू दुबईला पोहोचले आहेत आणि शुक्रवारी येथे संघाचे पहिले सराव सत्र झाले. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखालील संघाचे सर्व खेळाडू त्यात सहभागी झाले. या सराव सत्राचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. यावेळी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरदेखील दिसले. आशिया कपमध्ये पहिल्यांदाच गौतम गंभीर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळतील.
भारतीय क्रिकेट संघ शेवटचा 4 ऑगस्ट रोजी मैदानावर दिसला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या कसोटीचा हा शेवटचा दिवस होता. टी-20 बद्दल बोलायचे झाले, तर भारताने वर्षाच्या सुरुवातीला शेवटचा सामना खेळला. त्यानंतर संघाचा सामना इंग्लंडशी झाला. भारताने ती मालिका सहज जिंकली. आयपीएलमध्ये खेळल्यानंतर भारतीय खेळाडू टी-20 फॉरमॅटपासून पूर्णपणे दूर आहेत.
भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शु भमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा आणि रिंकू सिंह.
सध्या दुबईमध्ये खूप उष्णता आहे. आशिया कप सुरू होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंना परिस्थितीशी जुळवून घेण्याचे आव्हान असेल. भारतात सर्वत्र पाऊस पडत असताना, दुबई आणि अबू धाबीमध्ये तीव्र उष्णता आहे, यामुळेच आशिया कप सामन्यांच्या सुरुवातीचा वेळ अर्ध्या तासाने वाढवण्यात आला आहे. तेथील तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबर 2025 रोजी रंगणार आहे. भारत पहिला सामना हा यूएईसोबत खेळणार आहे.
आशिया चषकामध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या एका विशेष विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. टी-20 आशिया चषकात हार्दिक पंड्या आठ सामने खेळला असून, त्यात त्याने गोलंदाज म्हणून 11 बळी घेतले आहेत. फलंदाजी करताना 83 धावा केल्या आहेत. या टी-20 आशिया चषकात आपल्या शंभर धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 17 धावांची गरज आहे. जर हार्दिकने स्पर्धेत 17 धावा केल्या, तर तो टी-20 आशिया चषकाच्या इतिहासात 100 पेक्षा जास्त धावा आणि दहापेक्षा जास्त बळी घेणारा पहिला खेळाडू ठरेल. याआधी कोणत्याही खेळाडूंनी अशी कामगिरी केलेली नाही.