

न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर असून, दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी संघात एका महत्त्वपूर्ण अष्टपैलू खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध 30 जुलैपासून पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ होणार आहे.
न्यूझीलंडचा संघ सध्या झिम्बाब्वेमध्ये टी-20 तिरंगी मालिका खेळत आहे. या मालिकेचा अंतिम सामना 26 जुलै रोजी हरारे येथे न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जाईल. या सामन्यानंतर न्यूझीलंडचा संघ यजमान झिम्बाब्वेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. याची सुरुवात 30 जुलैपासून होणार आहे. या महत्त्वपूर्ण कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंडच्या संघात एक मोठा बदल पाहायला मिळाला आहे.
न्यूझीलंडच्या संघात अष्टपैलू खेळाडू मायकल ब्रेसवेल याचा समावेश करण्यात आला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ब्रेसवेल दुखापतग्रस्त ग्लेन फिलिप्सची जागा घेईल. यापूर्वी ब्रेसवेलला किवी संघात स्थान देण्यात आले नव्हते, कारण कसोटी मालिकेदरम्यान तो ‘द हंड्रेड’ या स्पर्धेत खेळणार होता.
ब्लॅककॅप्सचे (न्यूझीलंड संघाचे टोपणनाव) मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी सांगितले की, ब्रेसवेल हा फिलिप्ससाठी एक अत्यंत सक्षम पर्याय आहे. वॉल्टर म्हणाले, ‘ग्लेनच्या दुखापतीमुळे कसोटी संघात एक जागा रिक्त झाली आहे आणि मायकल हा त्यासाठी सर्वात योग्य पर्याय आहे. मायकलचा अनुभव आणि कौशल्य संघातील संतुलन पूर्वीप्रमाणेच राखण्यास मदत करेल.’
त्यांनी पुढे सांगितले, ‘तो टी-20 संघासोबत येथेच उपस्थित आहे आणि पहिल्या कसोटीसाठी त्याची उपलब्धता निश्चित आहे, त्यामुळे आम्ही त्याचा संघात समावेश करत आहोत. आम्ही पहिल्या कसोटीनंतर परिस्थितीचा आढावा घेऊ आणि त्यानंतर दुसऱ्या कसोटीसाठी त्याचा संघात समावेश करण्याबाबत निर्णय घेऊ.’
विशेष म्हणजे, मायकल ब्रेसवेल पहिल्या कसोटी सामन्यानंतर झिम्बाब्वेहून थेट इंग्लंडला रवाना होईल आणि तेथे ‘द हंड्रेड’ स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यापूर्वी ‘सदर्न ब्रेव्ह’ संघात सामील होईल.
पहिला कसोटी सामना : 30 जुलै - 3 ऑगस्ट (बुलावायो)
दुसरा कसोटी सामना : 7 ऑगस्ट - 11 ऑगस्ट (बुलावायो)