पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० विश्वचषक स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला आहे. ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार्या टीम इंडियासमोर या स्पर्धेत अनेक मोठी आव्हाने असणार आहेत. साखळी सामन्यात भारतीय संघाला ९ जून रोजी पाकिस्तानशी १२ जूनला अमेरिकेशी आणि १५ जूनला कॅनडाचा सामना करायचा आहे.भारतीय संघाला T20 चॅम्पियन आणि 2011 मध्ये वन-डे चॅम्पियन बनवणाऱ्या युवराज सिंगने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला विजयासाठी मंत्र दिला आहे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या फायनलमध्ये कोणते दोन संघ धडक मारतील, याचे भाकितही केले आहे.
भारताने शेवटची आयसीसी स्पर्धा २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपाने जिंकली होती. याआधी दोन वर्षांपूर्वी युवराजच्या शानदार कामगिरीमुळे भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. भारताने 2007 मध्ये पहिला T20 विश्वचषक जिंकला होता ज्यात युवराजने इंग्लंडविरुद्धच्या साखळी सामन्यात वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात सहा षटकार ठोकले होते. भारताने एका दशकाहून अधिक काळ आयसीसी ट्रॉफी जिंकली नाही याबद्दल विचारले असता तो म्हणाला, 'मला विश्वास आहे की मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा आमच्या संघातील खेळाडूंना आत्मविश्वास आहे. भारतीय खेळाडूंनी स्वत:वर विश्वास ठेवला आणि पूर्ण क्षमतेने खेळ केला तर ते विजेतेपद मिळवू शकतात.
युवराजची T20 विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसी ॲम्बेसेडर म्हणूनही निवड झाली आहे. याआधीच्या स्पर्धांमध्ये आम्ही आमच्या बलस्थानावर लक्ष केंद्रित केले होते. तसेच प्रतिस्पर्ध्याकडे लक्ष द्या विरोधी संघ आपले कुठे नुकसान करू शकतो यावर लक्ष केंद्रित करू नका. आपल्या बलस्थानांवर लक्ष केंद्रित करा. भारतीय संघातील अनेक खेळाडूंकडे सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकून बराच काळ लोटला आहे. आशा आहे की यावेळी आमची टीम ही प्रतीक्षा संपवेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
टी-२० विश्वचषक स्पर्धेत कोणते दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करू शकतात? यावर युवराज सिंग म्हणाला की, "मला आशा आहे की, भारत आणि वेस्ट इंडिज किंवा पाकिस्तान यापैकी दोन संघ अंतिम फेरीत धडक मारतील; पण ऑस्ट्रेलिया संघ यंदा फायनलमध्ये असणार नाही."
हेही वाचा :