

T20 World Cup 2026 India squad problems
मुंबई : आगामी टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतर भारतीय संघाची एक मोठी कमकुवत बाजू उघड झाली आहे. जर वेळीच या उणिवांवर काम केले नाही, तर जागतिक स्पर्धेत टीम इंडियाला याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.
एखाद्या सामन्यात अपयश येऊ शकते, मात्र सलग चार सामन्यांत एकाच प्रकारच्या चुकीची पुनरावृत्ती होत असेल, तर ती गंभीर चिंतेची बाब आहे. भारतीय संघाच्या सलामी जोडीतील सातत्यपूर्ण अपयशामुळे आता संघ व्यवस्थापनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिका भारतीय संघाने जिंकली असली, तरी सलामीच्या जोडीने चाहत्यांची आणि निवडकर्त्यांची घोर निराशा केली आहे. चारही सामन्यांमध्ये भारतीय सलामीवीरांना भक्कम पाया रचून देण्यात अपयश आले.
पहिला सामना : केवळ १८ धावांवर पहिला गडी बाद झाला. संजू सॅमसन अवघ्या १० धावा करून माघारी परतला.
दुसरा सामना : संघाची धावसंख्या ६ असतानाच पहिला धक्का बसला. सॅमसन अवघ्या ६ धावांवर बाद झाला.
तिसरा सामना : पहिल्याच चेंडूवर भारताने विकेट गमावली. संजू सॅमसनला खातेही उघडता आले नाही.
चौथा सामना : यावेळीही शून्यावरच भारताची पहिली विकेट पडली. सलामीवीर अभिषेक शर्मा खाते न उघडता बाद झाला.
मालिका विजयामुळे पहिल्या तीन सामन्यांतील खराब सुरुवातीकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, चौथ्या सामन्यातील पराभवानंतर संघाचे हे कच्चे दुवे स्पष्टपणे समोर आले आहेत. मधल्या फळीने डाव सावरल्यामुळे विजय मिळत असले, तरी सलामीच्या जोडीचे अपयश आगामी विश्वचषकात भारताला महागात पडू शकते.
जर टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद मिळवायचे असेल, तर भारतीय संघ व्यवस्थापनाला सलामीच्या जोडीबाबत तातडीने ठोस निर्णय घ्यावे लागतील. अन्यथा, मोठ्या स्पर्धेत पराभवासाठी सज्ज राहावे लागेल, असा इशारा क्रिकेट तज्ज्ञांकडून दिला जात आहे.