

दुबई : आयसीसी टी-२० क्रमवारीत पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्माने रेटिंगमध्ये प्रचंड झेप घेत आपले अव्वल स्थान अधिक मजबूत केले आहे, तर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने दमदार कामगिरीच्या जोरावर पुन्हा एकदा 'टॉप १०' फलंदाजांच्या यादीत पुनरागमन केले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिका सुरू असतानाच आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये अभिषेक शर्मा जगातील 'नंबर वन' टी-२० फलंदाज म्हणून कायम आहे. विशेष म्हणजे, गेल्या वेळी अभिषेकचे रेटिंग ९०३ होते, जे आता वाढून ९२९ वर पोहोचले आहे. अभिषेक आता एका नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. २०२५ मध्ये त्याने ९३१ रेटिंग गुणांचा टप्पा गाठला होता. सध्या तो या विक्रमी आकड्यापासून अवघ्या दोन गुण दूर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांत अभिषेकची बॅट तळपली, तर तो रेटिंगचा नवा शिखर सर करेल.
भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ताज्या क्रमवारीत सूर्याने पाच स्थानांची मोठी झेप घेत सातवे स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सलग दोन अर्धशतके झळकावत नाबाद राहिल्याचा फायदा त्याला रेटिंगमध्ये मिळाला. सूर्या आता ७१७ रेटिंग गुणांसह सातव्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
क्रमवारीवर नजर टाकल्यास, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजांमधील अंतर आता लक्षणीयरीत्या वाढले आहे. इंग्लंडचा फिल सॉल्ट ८४९ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अभिषेक आणि सॉल्ट यांच्यातील ही मोठी तफावत पाहता, आगामी टी-२० विश्वचषकात अभिषेक शर्मा 'नंबर वन' फलंदाज म्हणूनच मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे.
भारतीय संघाचा युवा फलंदाज तिलक वर्मा सध्या खेळत नसला, तरी तो ७८१ रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर स्थिर आहे. अन्य फलंदाजांमध्ये इंग्लंडचा जोस बटलर (७७० रेटिंग) चौथ्या, पाकिस्तानचा साहिबजादा फरहान (७६३ रेटिंग) पाचव्या आणि श्रीलंकेचा पथुम निसांका (७५८ रेटिंग) सहाव्या स्थानावर कायम आहे.
सूर्यकुमार यादवने टॉप १० मध्ये पुनरागमन केल्यामुळे ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श आणि टिम सायफर्ट यांना प्रत्येकी एक स्थान खाली घसरावे लागले आहे. मात्र, तरीही हे खेळाडू टॉप १० मध्ये टिकून आहेत. सध्या आयसीसी टी-२० क्रमवारीत भारताचे तीन फलंदाज टॉप १० मध्ये आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांनंतर या क्रमवारीत पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे.