पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. यासह बाबर आझमच्या संघाने ही मालिका गमावली. पाकिस्तानने एकूण ४ पैकी २ सामने गमावले. तर पावसामुळे २ सामने रद्द झाले हाेते. या सामन्यानंतर पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज आझम खान ट्रोल होत आहे. सामन्यातील निराशाजनक कामगिरीमुळे त्याला सोशल मीडियावर चाहत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. जाणून घेवूया काय आहे यामागील कारण…
आझम खान हा पाकिस्तानचे माजी यष्टीरक्षक, फलंदाज मोईन खान यांचा मुलगा आहे. इम्रान खानच्या नेतृत्वाखाली १९९२ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या पाकिस्तानी संघात मोईन खान होते. ते पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्तेही हाेते. २०१४ मध्ये त्यांना पाकिस्तानी क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकही बनवण्यात आले होते. २०१६ पासून ते पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सचे मुख्य प्रशिक्षक आहेत.
पाकिस्तानी संघावर घराणेशाहीचा आरोप होत असतानाच T-20 विश्वचषकासाठी आझम खानच्या निवडीनंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आले होते. २५ वर्षीय आझम खानने अलीकडे कमी धावा केल्या आहेत. विकेटकीपर म्हणून त्याची कामगिरीही फारशी प्रभावी ठरलेली नाही.आझम खानच्या शेवटच्या पाच T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोनवेळा शून्यावर आऊट झाला आहे. त्याने सुमारे २० च्या सरासरीने एकूण ५९ धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानच्या चौथ्या T20I मध्ये तो शून्यावर बाद झाला. आझम खानने या सामन्यात दोन अतिशय सोपे झेल सोडले, त्यामुळे त्याच्या यष्टीरक्षणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्याने प्रथम मोहम्मद आमिरच्या षटकात फिल सॉल्टचा सोपा झेल सोडला. त्यानंतर फलंदाजीला आला तेव्हा ५ चेंडू वाया घालवून शून्यावर बाद झाला.
आझम खानला त्याच्या फिटनेसबद्दल अनेकदा ट्रोल केले जाते. त्याचे वजन १४० किलो होते, पण नंतर त्याने ३० किलो वजन कमी केले. आता त्याचे वजन ११० किलाे आहे. आताही वजनावरुन त्याला ट्रोल केले जात आहे. इंग्लड विरूद्धच्या सामन्यानंतर एका युजर्सने एक्सवर लिहिले की, "पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आझम खानच्या जागी ६०-६० किलो वजनाचे दोन खेळाडू घ्यावेत."
सोशल मीडियावर आजम खानच्या विरोधात कमेंट्स आणि मीम्स शेअर केले जात आहेत. एका युजर्सने एक्सवर लिहीले आहे की, 'आझम खानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे ही लाजिरवाणी बाब आहे'. एका युजर्सने 'आझम खान हे आपल्या देशातील घराणेशाहीचे सर्वोत्तम उदाहरण आहे. प्रत्येक विभागात त्याची कामगिरी मध्यम आहे. ज्या निर्लज्ज लोकांनी त्याला निवडून दिले त्यांच्यावर गुन्हा दाखल करून शिक्षा झाली पाहिजे. ही साधी चूक नसून गुन्हेगारी कृत्य आहे' असे म्हटले आहे. याशिवाय इतरही अनेकांनी विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.
हेही वाचा :