

Suryakumar Yadav MI: काही महिन्यापूर्वीच टी २० वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला कॅप्टन्सीसोबतच टी २० संघातील आपले स्थान देखील गमवावे लागले आहे. सध्या सूर्या कारकिर्दीच्या अशा विचित्र टप्प्यावर उभा आहे की तेथून कमबॅक करणं कठिण जाणार आहे.
त्यातच आता सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स देखील सोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी सकाळी सूर्यकुमार यादवच्या सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स बाबतच्या पोस्ट चाहत्यांना सापडत नव्हत्या. अनेकांना सूर्यकुमार यादवच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलचे स्क्रीनशॉट शेअर करून सूर्या मुंबई इंडियन्सला राम राम ठोकणार असल्याची शक्यता वर्तवली.
सूर्यकुमार यादव हा २०१८ पासून मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. तो कोलकाता नाईट रायडर्स सोडून मुंबईत आला होता. मुंबईच्या यशात सूर्यकुमार यादवचे देखील मोठे योगदान आहे. मात्र २०२६ च्या हंगामात त्याला म्हणावी तशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं आता संघ व्यवस्थापन त्याचा पर्याय शोधत आहे अशी चर्चा सुरू झाली.
दरम्यान, सूर्यकुमार यादव इन्स्टाग्रामवर मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पांड्याला फॉलो करतोय की नाही हे पाहण्याचा प्रयत्न केला असता. मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पांड्या यांची अकाऊंट सापडली नाहीत. सूर्यकुमार यादवचा मंबई इंडियन्स संघासदर्भातील एकमेव फोटो इन्स्टाग्रामवर आहे. तो फोटो रोहित शर्मा आणि एमएस धोनी या दोघांसोबतचा आहे.
सूर्यकुमारला आयपीएलच्या २०२६ च्या हंगामात फक्त २७० धावा करता आल्या आहेत. त्याने २०.७७ च्या सरासरीने या धावा केल्या. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहेत. मात्र संघ यंदाच्या आयपीएलमध्ये नवव्या स्थानावर पोहचली होती.