Suryakumar Yadav: 'माझ्या अपयशाची जबाबदारी...': एकदिवसीय कारकीर्दीतील अपयशाबाबत सूर्यकुमार यादवची मोठी कबुली

भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या सूर्यकुमारने एका मुलाखतीत सांगितले की, तो आपल्या एकदिवसीय कारकीर्दीमुळे निराश आहे.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavFile Photo
Published on
Updated on

Suryakumar Yadav ODI career

नवी दिल्ली: टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरलेल्या सूर्यकुमार यादवने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतील अपयशाची पूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली आहे. ५० षटकांच्या या प्रकारात अपेक्षित यश न मिळाल्याची खंत त्याने व्यक्त केली आहे.

सूर्यकुमार यादवने ३७ एकदिवसीय सामने खेळले असून, २५.७६ च्या सरासरीने ७७३ धावा केल्या आहेत. टी-२० मधील त्याचा प्रभाव पाहता ही आकडेवारी अत्यंत सर्वसाधारण मानली जाते. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा २०२३ च्या विश्वचषक अंतिम सामना हा त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना ठरला. त्यानंतर त्याला एकदिवसीय संघात स्थान मिळालेले नाही.

Suryakumar Yadav
Javed Miandad | माझ्‍या कॅप्‍टनला सोडा! इम्रान यांच्‍या सुटकेसाठी मियाँदादची आर्त हाक!

भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या सूर्यकुमारने एका मुलाखतीत सांगितले की, तो आपल्या एकदिवसीय कारकीर्दीमुळे निराश आहे. मात्र, यासाठी निवड समिती किंवा परिस्थितीला दोष न देता, या प्रकारानुसार स्वतःमध्ये बदल न करू शकल्याचे त्याने मान्य केले.

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना सूर्यकुमार म्हणाला, "काल्पनिक गोष्टी आपण कितीही बोलू शकतो. जर मी २०१६ मध्ये संघात आलो असतो, तर कसोटी खेळलो असतो आणि एकदिवसीय सामन्यांमध्येही उत्तम कामगिरी केली असती. पण वास्तव हेच आहे की मी फक्त एक कसोटी आणि एकच डाव खेळू शकलो. त्यानंतर इतर खेळाडू परत आले आणि मी मागे पडलो. पण एकदिवसीय क्रिकेटच्या बाबतीत मी स्वतःवर नक्कीच नाराज आहे."

तो पुढे म्हणाला, "टी-२० प्रमाणेच हासुद्धा मर्यादित षटकांचाच प्रकार आहे. पण प्रामाणिकपणे सांगायचे तर, या प्रकारासाठी जेवढी मेहनत घ्यायला हवी होती, तेवढी मी घेतली नाही असं मला वैयक्तिकरीत्या वाटतं."

सूर्यासाठी एकदिवसीय सामने कठीण का ठरले?

टी-२० मध्ये आपल्या आक्रमक फटकेबाजीने सामना फिरवणाऱ्या सूर्याच्या मते, एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजाला अत्यंत संयमी आणि नियोजनबद्ध खेळ करावा लागतो. तो म्हणाला, "चौथ्या, पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना परिस्थिती वेगाने बदलते. तुम्ही चौथ्या क्रमांकावर जाताना संघ शून्य धावांवर दोन बाद असू शकतो किंवा सहाव्या क्रमांकावर जाताना २४ धावांवर चार बाद असू शकतो. तिथे तुम्हाला कसोटी सामन्यासारखी सुरुवात करावी लागते. सुरुवातीला गोलंदाजांचा आदर करत हळूहळू डाव उभारावा लागतो. सुरुवातीला ५० किंवा ७५ च्या स्ट्राइक रेटने खेळून नंतर तो १०० आणि शेवटी टी-२० सारखा १३०-१४० पर्यंत न्यावा लागतो."

"मी अतिरिक्त मेहनत घेतली नाही"

मधल्या फळीत फलंदाजी मिळणार हे ठाऊक असूनही, टी-२० साठी करतो तितकी तयारी एकदिवसीय क्रिकेटसाठी केली नाही, अशी कबुली सूर्याने दिली. "मला या प्रकारात फलंदाजीचा नक्की कसा दृष्टिकोन असावा, हेच उमजले नाही. डोळ्यांची उघडझाप होईपर्यंत ते २०-२५ सामने निघून गेले. ते कसे गेले हे मला कळलेच नाही. मला अधिक एकदिवसीय सामने खेळता आले नाहीत याची नक्कीच हळहळ आहे. पण यासाठी दुसरा कोणीही जबाबदार नाही. मी स्वतःच जबाबदार आहे, कारण टी-२० साठी जितकी मेहनत घेतो, तितका अतिरिक्त सराव मी एकदिवसीय सामन्यांसाठी केला नाही," असे सूर्याने सांगितले.

Suryakumar Yadav
Anaya Bangar : 'आधी स्वतःला शिक्षित करा...': मारिझान कॅपच्‍या 'ट्रान्सजेंडर'वरील टीकेला अनाया बांगरचे खरमरीत प्रत्युत्तर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news