

हैदराबाद; वृत्तसंस्था : ‘आयपीएल 2026’मध्ये शुक्रवारी झालेल्या 67 व्या रोमांचक सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (एसआरएच) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (आरसीबी) 55 धावांनी पराभव केला. मात्र, या मोठ्या विजयानंतरही हैदराबादला गुणतालिकेत अव्वल दोन (टॉप-2) संघांमध्ये स्थान मिळवता आले नाही. दुसरीकडे, या सामन्यात पराभूत होऊनही ‘आरसीबी’च्या संघाने सरस नेट रनरेटच्या जोरावर गुणतालिकेत अव्वल स्थान (नंबर-1) पटकावले असून, पहिल्या क्वालिफायरसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या हाय-स्कोरिंग सामन्यात हैदराबादने ठेवलेल्या 256 धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना ‘आरसीबी’चा संघ 20 षटकांत 4 बाद 200 धावांपर्यंतच पोहोचू शकला.
हैदराबादची स्फोटक फलंदाजी; 255 धावांचा डोंगर
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या फलंदाजांनी ‘आरसीबी’च्या गोलंदाजीची पिसे काढली. सलामीवीर अभिषेक शर्माने अवघ्या 22 चेंडूंत 56 धावा कुटल्या, तर ट्रॅव्हिस हेडने 26 धावांचे योगदान दिले. यानंतर यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने ‘आरसीबी’च्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत 46 चेंडूंत 79 धावांची (9 चौकार, 2 षटकार) उत्कृष्ट खेळी केली. मधल्या फळीत हेन्रिक क्लासेनने अवघ्या 24 चेंडूंत 51 धावा कुटल्या, तर नितीशकुमार रेड्डीने 12 चेंडूंत नाबाद 29 धावा करत संघाला 4 बाद 255 या विशाल धाव संख्येपर्यंत पोहोचवले. ‘आरसीबी’कडून रसिक सलामने 2 बळी घेतले. मात्र, त्यासाठी त्याने 52 धावा मोजल्या.
‘आरसीबी’चा पाठलाग अयशस्वी
विजयासाठी 256 धावांच्या अवाढव्य लक्षाचा पाठलाग करताना ‘आरसीबी’ला मोठ्या भागीदारीची गरज होती. फॉर्मात असलेला विराट कोहली अवघ्या 15 धावांवर बाद झाल्याने संघाला मोठा धक्का बसला. व्यंकटेश अय्यरने 19 चेंडूंत 44 धावा करत डावाला गती दिली, तर कर्णधार रजत पाटीदारने 39 चेंडूंत 56 धावांची कर्णधारी खेळी खेळली. मधल्या फळीत कृणाल पंड्याने (नाबाद 41) आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या टीम डेव्हिडने (नाबाद 15) प्रयत्न केले; पण हैदराबादच्या नियंत्रित गोलंदाजीमुळे धावगती वाढवणे ‘आरसीबी’ला कठीण झाले. अखेर ‘आरसीबी’चा संघ 200 धावांवर रोखला गेला. हैदराबादकडून इशान मलिंगाने 4 षटकांत 33 धावा देऊन 2 महत्त्वाचे बळी घेतले.
विजय, पराभवानंतरचे गणित
या दणदणीत विजयामुळे आणि चांगल्या नेट रनरेटमुळे सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) संघाचे गुणतालिकेतील तिसरे स्थान कायम असून, प्ले-ऑफच्या शर्यतीत त्यांनी आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. दुसरीकडे या सामन्यातील पराभवानंतरही ‘आरसीबी’चा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. त्यांनी यापूर्वीच प्ले-ऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे.
हेन्रिक क्लासेनचा असाही विक्रम
सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज हेन्रिक क्लासनने ‘आयपीएल 2026’मध्ये आपल्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात क्लासनने 51 धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान ‘आयपीएल’च्या एकाच हंगामात चौथ्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याचा दिल्ली कॅपिटल्सच्या ऋषभ पंतचा विक्रम क्लासनने मोडीत काढला. 34 वर्षीय क्लासेनने चालू हंगामात आतापर्यंत 606 धावा केल्या आहेत. ‘आयपीएल’च्या इतिहासात चौथ्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करत 600 धावांचा टप्पा ओलांडणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर होता. पंतने 2018 च्या हंगामात दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून (आताची दिल्ली कॅपिटल्स) खेळताना 579 धावा केल्या होत्या.