

Sunil Gavaskar on IPL foreign players
मुंबई : आयपीएल २०२६ (IPL 2026) चा हंगाम जवळ येत असतानाच, काही परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरवर्षी खेळाडू विविध कारणांमुळे स्पर्धेतून माघार घेतात. यामुळे संघ व्यवस्थापनाला ऐनवेळी बदल करावे लागतात. या मुद्द्यावर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर परदेशी खेळाडूंच्या भूमिकेवर ताशेरे ओढत फ्रेंचायझींना कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.
'स्पोर्टस्टार'मधील स्तंभात गावस्कर म्हणाले, "काही परदेशी खेळाडू अनेकदा "भारतीय आदरातिथ्याचा" गैरफायदा घेतात, जे थांबायला हवे. काही परदेशी खेळाडू या लीगला 'गृहीत' धरत आहेत, त्यांना संघातून डच्चू दिला पाहिजे. इतकेच नाही तर, उशिरा येणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान देऊ नये, असा सल्लाही गावस्कर यांनी दिला आहे."
काही परदेशी खेळाडू फ्रेंचायझींना गृहीत धरतात. दुखापत किंवा कोणतीही ठोस वैयक्तिक कारणे नसतानाही ते उपलब्ध नसतात. फ्रेंचायझींचे मालक या खेळाडूंची सोय करण्यासाठी कोणत्याही थराला जातात. अनेकदा कोट्यधीश खेळाडूंच्या कुटुंबाचा प्रवास आणि राहण्याचा खर्चही मालक स्वतः उचलतात. हे भारतीय आदरातिथ्य आहे, पण काही खेळाडू याला आपला हक्क समजून परिस्थितीचा गैरफायदा घेतात, असेही गावस्कर यांनी सुनावले.
"आम्ही आतापासूनच अशा काही खेळाडूंबद्दल ऐकत आहोत जे विविध कारणांमुळे उपलब्ध नसणार आहेत. लिलावात निवड होण्यापूर्वी त्यांनी ही कारणे सांगितली नव्हती. जोपर्यंत संघ मालक कठोर होऊन अशा खेळाडूंना संघातून काढत नाहीत, तोपर्यंत जेतेपद मिळवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना खीळ बसत राहील. जेव्हा खेळाडू आपल्या मनाप्रमाणे येण्याचा निर्णय घेतात, तेव्हा विजेतेपदासाठी संघ बांधणीचे केलेले सर्व नियोजन कोलमडून पडते."
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात ऑस्ट्रेलियाचे जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांसारखे विदेशी स्टार खेळाडू त्यांच्या फिटनेसच्या कारणास्तव स्पर्धेत उशिरा सामील होण्याची शक्यता आहे.