Steve Smith : यशस्वी फील्डर..! स्टीव्ह स्मिथने द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत मोडला जो रूटचा ऐतिहासिक विक्रम

कसोटी कारकिर्दीत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला
Steve Smith Breaks Joe Root Record
स्मिथने इंग्लंडच्या जो रूटला मागे टाकत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक झेल घेणारा क्षेत्ररक्षक होण्‍याचा बहुमान आपल्‍या नावावर केला आहे. Pudhari
Published on: 
Updated on: 

Steve Smith Breaks Joe Root Record : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्टीव्ह स्मिथने आज (दि. ११ ऑक्‍टोबर) आपल्या कसोटी कारकिर्दीत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डरबन येथील किंग्समीड मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान स्मिथने इंग्लंडच्या जो रूटला मागे टाकत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक झेल घेणारा क्षेत्ररक्षक होण्‍याचा बहुमान आपल्‍या नावावर केला आहे.

डेव्हिड बडिंगहॅमचा झेल टिपत स्मिथने गाठला ऐतिहासिक टप्पा

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर डेव्हिड बडिंगहॅमचा झेल टिपत स्मिथने हा ऐतिहासिक टप्पा गाठला. ४९ धावांवर खेळत असलेला बडिंगहॅम कमिन्सच्या उसळत्या चेंडूवर चकवा बसून पहिल्या स्लिपमध्ये झेलबाद झाला. स्मिथने डावीकडे डाईव्ह मारत टिपलेला हा सुरेख झेल बडिंगहॅमचे अर्धशतक रोखणारा तर ठरलाच, शिवाय क्रीडा जगतात नवा इतिहास रचणाराही ठरला.

Steve Smith Breaks Joe Root Record
Steve Smith : स्टीव्ह स्मिथने केला जबरदस्त पराक्रम, विराट कोहलीही राहिला मागे!

जो रूटचा विक्रम मोडला

या झेलसह स्टीव्ह स्मिथच्या कसोटी क्रिकेटमधील झेलची संख्या २२१ वर पोहोचली आहे. त्याने जो रूटचा २२० झेलचा विक्रम मोडीत काढला. या यादीत भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड २१० झेलसह तिसऱ्या स्थानावर आहेत. तर श्रीलंकेचे महेला जयवर्धने (२०५), दक्षिण आफ्रिकेचे जॅक कॅलिस (२००) आणि ऑस्ट्रेलियाचे रिकी पाँटिंग (१९६) अनुक्रमे चौथ्या, पाचव्या व सहाव्या क्रमांकावर आहेत.

कसोटीतील सर्वाधिक झेल (यष्टीरक्षक वगळून)

  • स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया): २२१*

  • जो रूट (इंग्लंड): २२०

  • राहुल द्रविड (भारत): २१०

  • महेला जयवर्धने (श्रीलंका): २०५

  • जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका): २००

  • रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया): १९६

Steve Smith Breaks Joe Root Record
PSL 2026 security threat | "पीएसएल मधून तत्‍काळ माघार घ्या" : पाकमधील सशस्त्र गटाची डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथला धमकी

पहिल्या डावात फलंदाजीत २५ धावांचे योगदान

क्षेत्ररक्षणात ऐतिहासिक कामगिरी करण्यापूर्वी स्मिथने पहिल्या डावात फलंदाजीत ५३ चेंडूंत दोन षटकारांसह २५ धावांचे योगदान दिले होते. ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे फलंदाज झटपट तंबूत परतल्‍यानंतर स्‍मिथने मार्नस लॅबुशेनच्या साथीने ६० धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पहिल्या दिवशी उपाहारानंतर मार्को यान्सनच्या चेंडूवर गल्लीमध्ये वियान मल्डरने त्याचा सखल झेल घेतला. एका टप्प्यावर १२४ धावांत ६ गडी गमावणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला मॅट रेनशॉच्या १९० धावांच्या झुंझाार शतकाने ३९० धावांचा सन्मानजनक टप्पा गाठून दिला. उत्तरार्धात दक्षिण आफ्रिकेने ५ बाद १६२ धावांपर्यंत मजल मारली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news