Steve Smith : स्टीव्ह स्मिथने केला जबरदस्त पराक्रम, विराट कोहलीही राहिला मागे!

Steve Smith : स्टीव्ह स्मिथने केला जबरदस्त पराक्रम, विराट कोहलीही राहिला मागे!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ हा कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या शानदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. पण सध्या कांगारूंच्या या डॅशिंग खेळाडूने टी-20 क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्याने असा पराक्रम केला आहे जो भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीही करू शकलेला नाही. स्मिथ सहसा ऑस्ट्रेलियासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलमध्ये नियमितपणे दिसत नाही. पण त्याचा जबरदस्त पराक्रम ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश (BBL) या टी-20 लीग मध्ये नोंदवला गेला.

बीबीएल 2022-23 मध्ये स्मिथने सिडनी सिक्सर्ससाठी फक्त तिसरा सामना खेळताना दोन बॅक टू बॅक शतके झळकावली आहेत. टी-20 लीगमध्ये त्याने असा पराक्रम केला जो आयपीएल फ्रँचायझी आरसीबी आणि टीम इंडियाचा फलंदाज कोहलीही करू शकलेला नाही. विराटने 2016 च्या आयपीएल हंगामात 4 आणि 2019 मध्ये एक शतके झळकावली आहेत. विराटने टी-20 क्रिकेटमध्ये बॅक टू बॅक सेंच्युरी केल्याचे कधीच घडले नाही. मात्र स्मिथने या प्रकरणात विराट कोहलीला मागे टाकले आहे. स्मिथचे आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये एकही शतक नसले तरी त्याने आयपीएलमध्ये शतक झळकावले आहे. दुसरीकडे, विराट कोहलीच्या नावावर आयपीएलमध्ये पाच आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये एक शतक आहे.

स्मिथची बॅक टू बॅक सेंच्युरी

स्मिथ सध्या बिग बॅश लीगच्या चालू हंगामात सिडनी सिक्सर्ससाठी फक्त तीन सामने खेळला आहे, परंतु या तिघांमध्ये त्याचा वेगळाच अवतार पाहायला मिळाला. स्मिथने तीन सामन्यांत दोन बॅक टू बॅक शतके झळकावली आहेत. पहिल्या सामन्यात त्याने 36 धावांची खेळी केली. तर अॅडलेड स्ट्रायकर्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात स्टीव्ह स्मिथने 56 चेंडूत 5 चौकार आणि 7 षटकारांसह 101 धावा केल्या. दुसरीकडे, शनिवारी सिडनी थंडर विरुद्धच्या त्याच्या तिसऱ्या बीबीएल 2022-23 सामन्यात, स्टीव्ह स्मिथने 66 चेंडूत नाबाद 125 धावा ठोकल्या. त्याच्या आजच्या खेळीत 5 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता. केवळ 3 सामन्यांत त्याने 131 च्या सरासरीने 262 धावा केल्या आहेत. 3 सामने खेळल्यानंतरच तो चालू हंगामातील पहिल्या 10 फलंदाजांमध्ये आहे. उर्वरित खेळाडूंनी किमान 10-11 सामने खेळले आहेत.

स्मिथचा हा नवा अवतार चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. हे पाहता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅरॉन फिंचने कौतुक केले आहे. 'सिडनीच्या या तरुण मुलाला खेळताना पाहून खूप आनंद झाला. मला असे वाटते की त्याचे भविष्य खूप चांगले आहे,' असे त्याने म्हटले. सोशल मीडियावर स्मिथच्या बॅटिंगची चर्चा होत असून त्याच्या या नव्या अवताराचे व्हिडिओही खूप व्हायरल होत आहेत. या चमकदार कामगिरीसह, त्याचा संघ सिडनी सिक्सर्सने बीबीएल 2022-23 च्या गुणतालिकेत सलग दोन विजयांसह 19 गुणांसह (9 विजय आणि 3 पराभव) दुसरे स्थान पटकावले आहे. स्टीव्ह स्मिथच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 63 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1008 धावा केल्या आहेत, तर आयपीएलमध्ये 103 सामन्यांमध्ये 2485 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट टी-20 इंटरनॅशनलमध्ये 125 च्या वर आहे, तर आयपीएलमध्ये तो 128 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने फलंदाजी करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news