

Smriti Mandhana:
मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना हिच्यासाठी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमचे मैदान पुन्हा एकदा अविस्मरणीय ठरले आहे. स्मृतीला तिचा प्रियकर आणि प्रसिद्ध गायक पलाश मुच्छल याने खास पद्धतीने लग्नाची मागणी घातली आहे. भारताने याच मैदानावर महिला विश्वचषक जिंकला होता, त्याच डीवाय पाटील स्टेडियमवर पलाशने स्मृतीला प्रपोज केले.
पलाशने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, पलाश स्मृतीला डोळ्यावर पट्टी बांधून डी.वाय. पाटील स्टेडियमच्या मध्यभागी घेऊन जातो. जेव्हा ती शेवटी डोळ्यावरची पट्टी काढते, तेव्हा तो एका गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करतो. आनंदित आणि भावूक झालेली स्मृती हा प्रस्ताव स्वीकारते. काही क्षणांनंतर, स्मृती आणि पलाशचे मित्र-मैत्रिणी आनंद साजरा करण्यासाठी मैदानावर धावत येतात. पलाशची बहीण, लोकप्रिय गायिका पलक मुच्छल देखील तेथे त्यांना भेटते. "तिने होकार दिला," असे पलाशने कॅप्शनमध्ये व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे.
स्मृती आणि पलाश येत्या रविवार, २३ नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुरुवारी त्यांना एका अभिनंदन पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या.
स्मृतीने तिच्या विश्वचषक विजेत्या सहकारी खेळाडू जेमिमाह रॉड्रिग्स आणि राधा यादव यांच्यासह इतरांना घेऊन बनवलेल्या एका रीलद्वारे सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना लग्नाची बातमी दिली होती.
स्मृती मानधना सध्या तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. भारताला पहिला विश्वचषक जिंकून देण्यात तिची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. विश्वचषक स्पर्धेत तिने भारतीय फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा केल्या. नऊ डावांमध्ये विक्रमी ४३४ धावा करून ती एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारी भारतीय ठरली.