

Smriti Mandhana
मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधना हिच्या आयुष्यातील सर्वात कठीण रात्र कोणती, असा प्रश्न विचारण्यात आला असता ती काही सेकंद शांत राहिली. त्यानंतर तिने विश्वचषकाचा उल्लेख केला. पण त्याचवेळी आपण फक्त क्रिकेटबद्दलच चर्चा करणार असल्याचे तिने सांगितले. यावेळी ती भावुक झाली होती.
स्मृती मानधनाने राज शामानी यांच्या पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी तिला तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण रात्र कोणती होती, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी ती काही क्षण थांबली. विचार केल्यानंतर तिने, “बहुधा एखादा विश्वचषक,” असे उत्तर दिले.
मात्र, स्मृतीने नेमका कोणता सामना किंवा कोणत्या वर्ल्ड कपमधील प्रसंग तिच्या डोळ्यासमोर होता, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. त्याऐवजी तिने लगेचच, “मी फक्त क्रिकेटबद्दलच बोलेन,” असे सांगितले.
अलीकडच्या काळात स्मृती मानधनाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहेत. विशेषतः तिच्या विवाहाच्या घडामोडींमुळे तिचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत आले होते. मात्र, पॉडकास्टदरम्यान स्मृती या विषयावर काहीही बोलली नाही.
‘आयुष्यातील सर्वात कठीण रात्र’ कोणती, या प्रश्नाचे उत्तर देताना तिने कोणत्याही वैयक्तिक घटनेचा किंवा विवाहाशी संबंधित प्रसंगाचा थेट उल्लेख केला नाही. त्यामुळे तिच्या मनात नेमकी कोणती घटना होती, याबाबत कोणतेही स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत. स्मृतीने केवळ वर्ल्ड कपशी संबंधित एखाद्या आठवणीचा उल्लेख केला आणि त्यानंतर वैयक्तिक आयुष्याऐवजी क्रिकेटवरच बोलू असे सांगितले. तिच्या या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे.