

दुबई; वृत्तसंस्था : महिला टी-२० आशिया चषकाच्या जेतेपदासाठी आज (रविवार, दि. १३) भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध भिडणार असून विक्रमी आठव्या जेतेपदावर नाव कोरण्यासाठी भारत पुन्हा एकदा शेफाली वर्मा-दीप्ती शर्मा यांच्या कामगिरीवर विसंबून असेल. ही लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता खेळवली जाणार आहे.
शेफालीने या स्पर्धेत दोन अर्धशतकांसह सर्वाधिक १६८ धावा फटकावल्या असून दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील संथ आणि फिरकीला पोषक खेळपट्ट्यांवर इतरांना संघर्ष करावा लागत असताना, तिने मात्र सहजतेने सातत्यपूर्ण धावांची आतषबाजी केली आहे. दुसरीकडे स्मृती मानधनाने (१५४ धावा) एका शतकासह चमक दाखवली असली, तरी दोन सामन्यांत ती एकेरी धावसंख्येवर बाद झाल्याने येथे तरी तिला सूर सापडावा, ही अपेक्षा असेल.
गोलंदाजीत भारताची अनुभवी अष्टपैलू दीप्ती शर्मा आघाडीवर राहिली आहे. श्रीलंकेची कर्णधार चामरी अटापट्टू हिच्यासह दीप्तीने स्पर्धेत सर्वाधिक प्रत्येकी ११ बळी टिपले आहेत. फलंदाजीतही तिचे योगदान मोलाचे ठरले असून, बांगला देशविरुद्धच्या उपांत्य फेरीत तिने केलेल्या १३ धावांमुळेच भारताला १४९ धावांपर्यंत मजल मारता आली होती.
लंकेची भिस्त कर्णधार अटापट्टूवर
कर्णधार अटापट्टूच्या जिद्दी वृत्तीचे प्रतिबिंब संपूर्ण श्रीलंकन संघात दिसून येत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात १३१ धावांचे आव्हान असताना लंकेचा संघ एकवेळ २ बाद ५ व पुढे ४ बाद ३३ अशा अडचणीच्या स्थितीत होता. मात्र, यानंतरही त्यांनी जिद्दीने लढत विजय अक्षरश: खेचून आणला होता. हर्षिता समरविक्रमा (३६ धावा) आणि कविशा दिलहारी (३३ धावा) यांनी संघाचा डाव सावरला, तर निलाक्षी डी सिल्वा आणि कौशिनी नुथ्यंगना यांनी संयमी फलंदाज साकारत संघाला स्पृहणीय विजय मिळवून दिला.
फलंदाजी व क्षेत्ररक्षणात सुधारणेची आवश्यकता
भारतासाठी सांघिक फलंदाजी आणि सुमार क्षेत्ररक्षण या मुख्य चिंतेच्या बाबी आहेत. क्षेत्ररक्षणातील चुका भारतासाठी डोकेदुखी ठरत असून, उपांत्य फेरीत भारताने बांगला देशविरुद्ध ४ झेल सोडले. या स्पर्धेतील ४ सामन्यांत भारताने आतापर्यंत एकूण ९ झेल सोडले आहेत. यात संघाला दुरुस्ती करावीच लागणार आहे.
‘त्या’ पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी!
यंदा आतापर्यंतच्या प्रवासात दोन्ही संघ अपराजित राहिले असले, तरी २०२४ च्या अंतिम फेरीत श्रीलंकेकडून पत्करावा लागलेला ८ गडी राखून लाजिरवाणा पराभव भारताच्या जिव्हारी लागणारा ठरला होता. त्या पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी येथे हरमनप्रीतच्या संघाकडे असेल.