

Smriti Mandhana
नवी दिल्ली: भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधना सध्या स्वप्नवत फॉर्ममध्ये असून, २०२५ या वर्षात ती एका मोठ्या जागतिक विक्रमाला गवसणी घालण्याच्या तयारीत आहे. पुरुष आणि महिला अशा दोन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारात या वर्षात सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनण्यासाठी स्मृतीला आता केवळ ६२ धावांची गरज आहे. असे केल्यास ती शुभमन गिल याला मागे टाकेल.
स्मृतीने २०२५ या वर्षात तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, वनडे, टी-२०) मिळून आतापर्यंत १,७०३ धावा ठोकल्या आहेत. एका वर्षात कोणत्याही महिला क्रिकेटपटूने केलेल्या या सर्वोच्च धावा आहेत. सध्या या यादीत शुभमन गिल १,७६४ धावांसह अव्वल स्थानी आहे. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी सामन्यात ६२ धावा करताच स्मृती क्रिकेट विश्वात या वर्षातील अव्वल स्थान पटकावेल.
श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात स्मृतीने आणखी एक मैलाचा दगड गाठला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण करणारी ती मिताली राजनंतरची दुसरी भारतीय आणि जगातील चौथी महिला खेळाडू ठरली आहे. मिताली राज, सुझी बेट्स (न्यूझीलंड) आणि शार्लोट एडवर्ड्स (इंग्लंड) यांच्या पंगतीत आता स्मृतीचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.
पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने आधीच ४-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आज होणाऱ्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करून ५-० ने मालिका खिशात घालण्याचा भारतीय संघाचा मानस आहे. चौथ्या सामन्यात स्मृतीने अवघ्या ४८ चेंडूत ८० धावांची झंझावाती खेळी केली होती, ज्यामुळे भारताने २२१ धावांचा डोंगर उभा केला होता.