Shubman Gill
नवी दिल्ली: इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू माँटी पानेसरने भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिलवर टीका केली आहे. गिलमध्ये आत्मसंतुष्टता असून आंतरराष्ट्रीय स्तरावर तिन्ही फॉरमॅटची जबाबदारी सांभाळण्यासाठी तो अजून पूर्णपणे तयार नाही. तो 'आळशी शॉट्स' खेळतो तसेच विराट कोहलीमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये जी आक्रमकता दिसते, ती गिलमध्ये नाही, असे पानेसरने म्हटले आहे.
पानेसरने 'एएनआय'शी बोलताना सांगितले की, "शुभमन एक आत्मसंतुष्ट क्रिकेटपटू आहे. त्याच्याकडे प्रतिभा खूप आहे, पण तो सामन्यात आळशी शॉट्स खेळू लागतो. विराट कोहलीची तीव्रता आणि आक्रमकता तिन्ही फॉरमॅटमध्ये स्पष्टपणे दिसते. शुभमन गिल तसे करू शकत नाही. त्याच्यावर हा खूप मोठा भार आहे. तो तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार होऊ शकत नाही."
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये झगडत असताना पानेसरने हे वक्तव्य केले आहे. भारताला नुकताच न्यूझीलंडविरुद्ध ३-० आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २-० अशा व्हाईटवॉश पराभवांचा सामना करावा लागला आहे.
गंभीरच्या प्रशिक्षकपदाबद्दल बोलताना पानेसर म्हणाला की, "गौतम गंभीर हा व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये यशस्वी ठरला असल्याने तो एक चांगला प्रशिक्षक आहे. पण त्याने रणजी ट्रॉफीमधील प्रशिक्षकांशी चर्चा करून कसोटी क्रिकेटमध्ये संघ कसा बांधायचा हे समजून घेतले पाहिजे. सध्याचा भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये कमकुवत आहे, ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा तुम्ही तीन मोठे खेळाडू निवृत्त करता, तेव्हा उर्वरित खेळाडूंना तयार ठेवणे कठीण जाते."
विराट कोहलीच्या अनुपस्थितीवर पानेसर म्हणाला की, "टी 20 मध्ये विराट कोहलीची उणीव कदाचित तितकी भासणार नाही, पण कसोटी क्रिकेटमध्ये तो संघात नसल्याचा परिणाम स्पष्ट दिसतोय आणि संघाची तीव्रता कमी झाली आहे."
पानेसरने असा दावाही केला की, भारतीय खेळाडू कसोटी क्रिकेटसाठी पुरेशा प्रमाणात तयार नाहीत. तरुण खेळाडूंचा ओढा चार दिवसांच्या क्रिकेटमध्ये मेहनत घेण्याऐवजी आयपीएल करार मिळवण्याकडे जास्त आहे. तो पुढे म्हणाला, "रणजी ट्रॉफी आणि भारताचा कसोटी संघ यांच्यातील दरी खूप मोठी आहे. रणजी ट्रॉफीची सिस्टीम सध्या कमकुवत आहे. मुलांना फक्त आयपीएल खेळायचे आहे, त्यांना मोठे करार हवे आहेत. ४ दिवसांच्या क्रिकेटमध्ये खूप मेहनत लागते, म्हणून त्यांना तिथे कमी वेळ द्यायचा आहे. टी-२० मध्ये पैसा जास्त आहे आणि कसोटीत कमी. हीच वस्तुस्थिती आहे. भारताला कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी वेळ लागेल."