

भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल याची जुलै महिन्यासाठी आयसीसी 'पुरुष प्लेअर ऑफ द मंथ' म्हणून निवड करण्यात आली आहे. गिलने इंग्लंडमध्ये जुलै महिन्यात खेळल्या गेलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये ९४.५० च्या प्रभावी सरासरीने ५६७ धावा फटकावल्या होत्या. हा प्रतिष्ठित पुरस्कार तब्बल चौथ्यांदा जिंकणारा तो पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. यापूर्वी त्याला जानेवारी २०२३, सप्टेंबर २०२३ आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. महिला क्रिकेटमध्ये ॲश गार्डनर आणि हेली मॅथ्यूज यांनी प्रत्येकी चार वेळा हा पुरस्कार जिंकण्याची कामगिरी केली आहे.
गिलने इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल ४३० धावांची विक्रमी खेळी केली होती. त्याच्या २६९ आणि १६१ धावांच्या खेळीमुळे भारताला मालिकेत १-१ अशी बरोबरी साधता आली. त्यानंतर, मँचेस्टर येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने १०३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून सामना अनिर्णित राखण्यात आणि मालिका जिवंत ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली.
या पुरस्काराच्या शर्यतीत गिलसोबत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू वियान मुल्डर यांचा समावेश होता. चौथ्यांदा हा पुरस्कार मिळाल्यानंतर गिल म्हणाला, ‘‘जुलै महिन्यासाठी आयसीसी 'प्लेअर ऑफ द मंथ' म्हणून निवड होणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. कर्णधार म्हणून माझ्या पहिल्याच कसोटी मालिकेतील कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळाल्याने तो माझ्यासाठी अधिक विशेष आहे.’’
गिल पुढे म्हणाला, ‘‘बर्मिंगहॅममध्ये झळकावलेले द्विशतक माझ्यासाठी निश्चितच अविस्मरणीय राहील. तो माझ्या इंग्लंड दौऱ्यातील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक असेल. कर्णधार म्हणून इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका माझ्यासाठी एक शिकण्याचा अनुभव होता आणि दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळ केला. मला खात्री आहे की हा दौरा दोन्ही संघांतील खेळाडूंच्या दीर्घकाळ स्मरणात राहील.’’
इंग्लंडची फलंदाज सोफिया डंकले हिला जुलै २०२५ साठी आयसीसी 'महिला प्लेअर ऑफ द मंथ' म्हणून घोषित करण्यात आले. डंकलेने या शर्यतीत तिची सहकारी सोफी एक्लेस्टोन आणि आयर्लंडची कर्णधार गॅबी लुईस यांना मागे टाकले. या काळात तिने एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.
तिने भारताविरुद्ध मायदेशात दोन्ही प्रकारांतील सर्व सात सामने खेळले. यामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये १२६ धावा आणि चार टी-२० सामन्यांमध्ये १३४.५७ च्या स्ट्राइक रेटने १४४ धावा केल्या. डंकले टी-२० मालिकेत इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आणि साऊथम्प्टन येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तिने ९२ चेंडूंत ८३ धावांची शानदार खेळी केली होती.