

नवी दिल्ली : गेल्या वर्षात वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणारा भारतीय संघातील स्टार फलंदाज शुभमन गिलला क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार सोहळा 15 मार्च रोजी दिल्लीत होत असून, या सोहळ्यात टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयकडून दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. शुभमन गिलची गतवर्षातील कामगिरी सरस ठरली आहे. राहुल द्रविड यांना क्रिकेटमधील मोठे योगदान तसेच, 2024 च्या टी विश्वचषक विजेतेपदापर्यंत त्यांनी संघाला केलेल्या अमुल्य मार्गदर्शनाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
यंदाच्या सोहळ्यात भारतीय संघाला अंडर-19 वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार आयुष म्हात्रेला लाला अमरनाथ पुरस्काराने, तर भारताची माजी कर्णधार मिताली राजला जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याचे समजते. त्याचबरोबर देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम क्रिकेट असोसिएशनचा पुरस्कार हा मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
शुभमन गिलला आयसीसी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरूवात होण्याआधी टी-20 संघातून बाहेर करण्यात आले होते. पण वनडे आणि कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी गिलकडेच असून, त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण 983 धावा केल्या, त्यात गतवर्षी इंग्लंडविरुद्ध ड्रॉ झालेल्या मालिकेतील तब्बल 754 धावांचा समावेश असून, त्याची सरासरी 70 पेक्षा अधिक होती.
वनडे क्रिकेटमध्ये त्याने 490 धावा केल्या, त्यात चॅम्पियन्स ट्रॉफीतील 188 धावांचा समावेश आहे. सर्व फॉरमॅट्समध्ये मिळून गिलने 49 च्या सरासरीने 1764 धावा केल्या असून, ज्यात सात शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गिलने गुजरात टायटन्ससाठी 50 च्या सरासरीने 650 धावा केल्या आहेत.