

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत टीम इंडियाची गाडी रुळावरून घसरल्याचे दिसत आहे. पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यापूर्वी संघासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. धक्कादायक बातमी अशी आहे की, भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर होण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये सध्या मोठा संघर्ष करावा लागत आहे, हे स्पष्ट आहे. विशेष म्हणजे, मायदेशातही पराभवाचा सामना करावा लागणे, यामुळे संघाच्या खेळाच्या पातळीबद्दल अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर आता टीम इंडियाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात संघाचा कर्णधार शुभमन गिल दुखापतीमुळे खेळू शकणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या पराभवानंतर कर्णधारच बाहेर होण्याची शक्यता असल्याने टीम इंडियासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, जर गिल खेळू शकला नाही, तर संघाची धुरा कोण सांभाळणार? आणि गिलच्या जागी प्लेईंग 11 मध्ये कोणाला संधी मिळणार?
सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, जर गिल खेळू शकला नाही, तर संघाची धुरा कोण सांभाळणार? आणि गिलच्या जागी प्लेईंग 11 मध्ये कोणाला संधी मिळणार?
द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय कर्णधार शुभमन गिलला दुखापत झाली होती. याच कारणामुळे तो दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला नव्हता. मालिकेतील दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा सामना २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळवला जाणार आहे. यासाठी संघ लवकरच गुवाहाटीला पोहोचेल, परंतु गिल या सामन्यातून बाहेर राहू शकतो, असे संकेत मिळत आहेत.
याबाबत बीसीसीआयने (BCCI) अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, जर गिल पूर्णपणे तंदुरुस्त नसेल, तर लवकरच याबद्दलची माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे. चाहत्यांचे लक्ष आता गिलच्या दुखापतीच्या अपडेटकडे लागले आहे.
जर शुभमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला, तर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी कोणावर येणार? या प्रश्नाच्या उत्तराची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. सध्या द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऋषभ पंत हा भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. अशा परिस्थितीत, पंतच दुसऱ्या कसोटीत कर्णधारपदाची धुरा सांभाळताना दिसू शकतो, हे स्पष्ट आहे.
वास्तविक, कर्णधारपदासाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी, अशा आणीबाणीच्या परिस्थितीत उपकर्णधारालाच कर्णधार बनवण्याची प्रथा भारतीय क्रिकेटमध्ये आहे. हीच परंपरा याही वेळेस कायम राहण्याची दाट शक्यता आहे.
गिलच्या अनुपस्थितीत प्लेईंग 11 मध्ये कोणाला संधी मिळणार, हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिल्या कसोटीत साई सुदर्शनला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळाले नव्हते, तर तिसऱ्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली होती.
आता दुसऱ्या सामन्यात सुंदर खेळणार की नाही, हे नंतर ठरेल, पण गिलच्या जागी साई सुदर्शन खेळताना दिसू शकतो. साई सुदर्शनशिवाय संघ व्यवस्थापन देवदत्त पडिक्कल याचाही विचार करेल असे बोलले जात आहे. पण, या निर्णयांसाठी गुवाहाटी येथील मैदानाची खेळपट्टी निर्णायक ठरेल अशीही चर्चा आहे.