

ind vs sa 1st test wtc 2025-27 points table updated team india slip
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच लढतीत भारतीय संघाला ३० धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी, टीम इंडियाला चौथ्या डावात विजयासाठी केवळ १२४ धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र, भारतीय संघाचा दुसरा डाव ९३ धावांवर संपुष्टात आला आणि दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) चौथ्या पर्वातील गुणतालिकेत मोठा झटका बसला आहे. टीम इंडिया थेट चौथ्या क्रमांकावर घसरली आहे.
द. आफ्रिकेविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया डब्ल्यूटीसी २०२५-२७ च्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होती. परंतु, कोलकाता कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघाचे स्थान आता चौथ्या क्रमांकावर आले आहे. भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी ५४.१७ इतकी झाली आहे. WTC च्या या सायकलमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत एकूण ८ सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामन्यांत विजय मिळवला आहे, तर तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या उलट, द. आफ्रिकेच्या संघाला कोलकाता कसोटीतील विजयाचा मोठा फायदा झाला आहे. त्यांचा संघ चौथ्या स्थानावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आफ्रिकेच्या संघाने WTC च्या या पर्वात आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन सामन्यांत त्यांनी विजय मिळवला आहे, तर एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यांची विजयाची टक्केवारी ६६.६७ झाली आहे.
WTC च्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या क्रमांकावर अधिराज्य गाजवत आहे. त्यांच्या विजयाची टक्केवारी १०० आहे. श्रीलंकेची विजयाची टक्केवारी ६६.६७ असून हा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
त्यानंतर पाकिस्तान (विजयी टक्केवारी ५०) पाचव्या, इंग्लंडचा (विजयी टक्केवारी ४३.३३) सहाव्या, शेवटच्या तीन स्थानांवर बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचे संघ आहेत. विशेष म्हणजे, या WTC सायकलमध्ये अद्याप न्यूझीलंडच्या संघाने एकही सामना खेळलेला नाही.