

संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचा (RR) संघ सोडून चेन्नई सुपरकिंग्स (CSK) मध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. याचा अर्थ, आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या हंगामापूर्वी राजस्थान रॉयल्सला आपला नवा कर्णधार निवडावा लागणार आहे.
आयपीएल २०२६ चा हंगाम अजून दूर असला तरी, खेळाडूंना संघामध्ये कायम ठेवण्याची (Retention) अंतिम तारीख जवळ येत आहे. येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व दहा संघांना आपण कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले आहे आणि कोणाला मुक्त केले आहे, याची माहिती द्यावी लागेल. विशेष म्हणजे, यंदा प्रत्येक संघ हवे तितके खेळाडू रिटेन करू शकतात. याबाबत कोणतीही निश्चित संख्या ठरलेली नाही. याच दरम्यान, काही संघ खेळाडूंची अदलाबदल (ट्रेड) करतानाही दिसतील. सध्या यात सर्वात मोठे नाव संजू सॅमसनचे पुढे येत आहे.
संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स (RR) सोडून सीएसकेत जात असून, त्याच्या बदल्यात रवींद्र जडेजा आणि सॅम कुरन सीएसकेकडून राजस्थान रॉयल्समध्ये येतील, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता राजस्थान रॉयल्सचा नवा कर्णधार कोण असेल, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. संघ नेतृत्वासाठी अनेक खेळाडू दावेदार असल्याचे बोलले जात आहे.
सॅमसन गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे यशस्वीरित्या नेतृत्व करत आहे. २०२५च्या हंगामात तो दुखापतीमुळे बाहेर असताना रियान परागने ही जबाबदारी सांभाळली होती. आता संजू राजस्थान सोडून सीएसकेमध्ये जात असल्याचे वृत्त समोर आले आहे. संजू तेथे कर्णधार होईल की नाही, हे भविष्यात स्पष्ट होईल; परंतु राजस्थानचा नवा कर्णधार कोण असणार, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
यासाठी काही खेळाडूंची नावे सर्वात मोठे दावेदार म्हणून समोर येत आहेत. यात पहिले नाव रियान परागचे आहे, ज्याने मागील हंगामात काही सामन्यांमध्ये आरआरचे नेतृत्व केले होते. तो सुरुवातीपासूनच राजस्थान संघाशी जोडला गेलेला आहे आणि संघातील सर्वात विश्वासू खेळाडूंपैकी एक आहे. विशेष म्हणजे, रियानचे काही हंगाम अत्यंत खराब गेले होते. पण त्याने मागील हंगामामध्ये आपल्या खेळात कमालीची सुधारणा केली आणि उत्कृष्ट प्रदर्शन केले. तथापि, त्याला आरआरचे नेतृत्व दिले जाईल की नाही, याबद्दल निश्चितपणे शंका आहे.
राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदासाठीचा आणखी एका मोठ्या नावाची चर्चा आहे. तो म्हणजे यशस्वी जैस्वाल. जैस्वाल हा सुरुवातीपासूनच या संघासोबत आहे. आयपीएलमध्ये राजस्थानसाठी खेळूनच जैस्वालने भारतीय संघापर्यंतचा प्रवास निश्चित केला आहे. त्याच्यावर राजस्थान संघाने मोठी रक्कम खर्च केली आहे. संघातील जुन्या खेळाडूच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, त्यालाकडेही संघ नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. जर तो कर्णधार बनला, तर राजस्थान रॉयल्स दीर्घकालीन योजनेवर काम करत आहे, असे समजायला हवे. सद्यस्थिती पाहता, जैस्वाल सर्वात प्रमुख दावेदार म्हणून पुढे आला आहे.
सीएसकेमधून ट्रेड होऊन राजस्थानमध्ये येणाऱ्या दोन खेळाडूंमध्ये एक रवींद्र जडेजा आणि दुसरा सॅम कुरन यांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे, याबाबत सीएसके, राजस्थान किंवा कोणत्याही खेळाडूने अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नाही. म्हणजेच, अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. रवींद्र जडेजाकडे आयपीएलचा भरपूर अनुभव आहे आणि त्याने सीएसकेचे कर्णधारपदही भूषवले आहे. त्यालाही एक मजबूत दावेदार मानले जाऊ शकते. सॅम कुरननेही आयपीएलमधील काही संघांचे नेतृत्व केले आहे.
याचा अर्थ, राजस्थान संघाकडे एक-दोन नव्हे, तर तीन ते चार प्रबळ दावेदार आहेत. कर्णधारपदाबाबत राजस्थानचा संघ काय निर्णय घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.