Sanju Samson चा धडाका; धोनी-रैना यांना मागे टाकत रचला IPL मध्ये नवा इतिहास

गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात डावातील दुसऱ्या षटकात रबाडाच्या चेंडूवर पॉईंटच्या वरून चौकार मारताच सॅमसनने IPL मध्ये मोठी कामगिरी नोंदवली.
Sanju Samson IPL History Broken Record of MS Dhoni Suresh Raina
Published on
Updated on

चेन्नई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2026) १९ व्या हंगामातील ३७ व्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले आहेत. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या लढतीत चेन्नईचा सलामीवीर संजू सॅमसनने बॅटने मोठी कामगिरी करत क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या खेळीतील तिसरा धाव घेताच सॅमसनने आयपीएलमध्ये एका विशेष विक्रमाला गवसणी घातली असून, या शर्यतीत त्याने भारताचे दिग्गज खेळाडू एम.एस. धोनी आणि सुरेश रैना यांनाही पिछाडीवर सोडले आहे.

५००० धावांचा टप्पा पार करणारा वेगवान भारतीय

संजू सॅमसनने आयपीएल कारकिर्दीत सातत्यपूर्ण फलंदाजीचे दर्शन घडवले आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात डावातील दुसऱ्या षटकात कागिसो रबाडाच्या चेंडूवर पॉईंटच्या वरून चौकार मारताच सॅमसनने आयपीएलमधील आपल्या ५००० धावा पूर्ण केल्या. विशेष म्हणजे, सर्वात कमी चेंडूंत ५००० धावांचा टप्पा गाठणारा तो आता पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

यापूर्वी हा विक्रम 'मिस्टर आयपीएल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनाच्या नावावर होता. रैनाने ३६२० चेंडूंत ५००० धावा पूर्ण केल्या होत्या, तर संजू सॅमसनने अवघ्या ३५५५ चेंडूंत हा पल्ला गाठून नवा मैलाचा दगड प्रस्थापित केला. जागतिक स्तरावर विचार केला असता, हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिविलियर्सच्या (३२८८ चेंडू) नावावर असून सॅमसन आता या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूंत ५००० धावा करणारे फलंदाज:

  • एबी डिविलियर्स: ३२८८ चेंडू

  • डेव्हिड वॉर्नर: ३५५४ चेंडू

  • संजू सॅमसन: ३५५५ चेंडू

  • सुरेश रैना: ३६२० चेंडू

  • के.एल. राहुल: ३६८८ चेंडू

  • एम.एस. धोनी: ३६९१ चेंडू

वैयक्तिक खेळी आणि आकडेवारी

आजच्या सामन्यात गुजरातच्या शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईकडून सलामीला आलेल्या संजू सॅमसनची खेळी आज फार मोठी होऊ शकली नाही. तो १५ चेंडूंत ११ धावा काढून बाद झाला, मात्र या छोट्या खेळीत त्याने ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली.

आयपीएल २०२६ च्या हंगामात सॅमसनने आतापर्यंत दोन शतके झळकावून आपली ताकद दाखवून दिली आहे. त्याच्या एकंदर आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकल्यास, त्याने १८५ सामन्यांमध्ये ३१.६९ च्या सरासरीने ५००८ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतके आणि २६ अर्धशतकांचा समावेश असून, त्याच्या या आक्रमक फलंदाजीमुळे चेन्नईच्या डावाला मोठी मजबुती मिळत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news