

India vs Sri Lanka Test Series 2026 : श्रीलंका दौऱ्यावरील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. संघातील स्टार फलंदाज साई सुदर्शन दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. सुदर्शनच्या उजव्या पायाला स्ट्रेस फ्रॅक्चरची समस्या होती, ज्यातून तो अद्याप पूर्णपणे सावरू शकलेला नाही. वैद्यकीय पथकाच्या देखरेखीत त्याच्या प्रगतीत सुधारणा होत होती, परंतु त्याच्या पायाच्या अंगठ्याची वेदना पुन्हा उफाळून आल्याने त्याला या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.
साई सुदर्शनपूर्वी भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर झाला आहे. या दोघांची श्रीलंका दौऱ्यासाठी संघात निवड झाली असली तरी त्यांच्या तंदुरुस्तीबाबत साशंकता होती. आता साई सुदर्शनच्या जागी निवड समिती संघात कोणाला संधी देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारतीय संघाची सध्या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या समस्येने डोकेदुखी वाढवली आहे. बुमराह आणि सुदर्शन मालिकेबाहेर झाले असतानाच अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आणि स्वतः कर्णधार शुभमन गिलही दुखापतीशी झुंजत आहेत. तसेच वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असणार नाही. शुभमन गिल दुखापतीच्या कारणास्तव श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्यात मैदानात उतरला नव्हता. सराव सामन्यात संघ व्यवस्थापनाने गिलबाबत कोणताही धोका पत्करण्यास नकार दिला. एकामागून एक प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त होत असल्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या समोरील अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.