

Narendra Modi Baba Bageshwar comment: "आज सर्व विद्यार्थी दीक्षांत समारंभाला उपस्थित आहेत. उपस्थित प्रत्येकाच्या मनात भविष्याबाबत काही ना काही विचार नक्कीच सुरू असतील. तुमच्या मनाच्या कोपऱ्यात कदाचित काहीतरी वेगळेच विचार सुरू असतील. मी काही 'बाबा बागेश्वर' नाही; पण प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात नक्कीच काहीतरी विचार घोळत आहेत. तुमच्यापैकी प्रत्येकाकडे भविष्याबाबतची काहीतरी दृष्टी (व्हिजन) असेलच," अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिश्किल टिप्पणी केली. आयआयटी दिल्लीतील दीक्षांत समारंभ ते बोलत होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज दीक्षांत समारंभावेळी एखादा विद्यार्थी आपल्या पहिल्या नोकरीची आणि पगाराची वाट पाहत असेल, तर कोणी स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचे स्वप्न पाहत असेल. त्याच वेळी, काही विद्यार्थी पुढील स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे ध्येय ठेवून असतील. प्रत्येकाचे स्वप्न आणि ध्येय वेगळे असले, तरी आज सर्वांच्या मनात एकसारखाच उत्साह आहे.
त्यांनी विद्यार्थ्यांना आयआयटी दिल्लीतील त्यांच्या पहिल्या दिवसाची आठवण करून दिली. कालच ओरिएंटेशन झाल्यासारखे वाटते आणि पाहता पाहता आज दीक्षांत समारंभाचा दिवसही आला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आजपासून सर्व विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एका नव्या अध्यायाची सुरुवात होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आज जगभरातील व्यवस्था वेगाने बदलत असून तंत्रज्ञान हे त्यामागचे मोठे कारण आहे. येत्या २०-३० वर्षांत जग कसे असेल याचा अंदाज लावणे कठीण आहे. तंत्रज्ञान बदलेल, जग बदलेल, परंतु या बदलत्या जगात तोच पुढे जाईल जो सतत शिकत राहील."अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल पदके मिळाली आहेत. मी तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. मात्र, त्यात आणखी काही मुली असत्या तर मला अधिक आनंद झाला असता. फक्त एक-दोनच का? त्यांची संख्या आणखी असायला हवी होती," असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलामगिरीचा काळ आणि त्या काळातील पिढीच्या संघर्षाचीही आठवण करून दिली. प्रत्येक पिढीची स्वतःची राष्ट्रीय जबाबदारी असते. स्वातंत्र्यापूर्वी लोकांसमोर देशाला स्वतंत्र करण्याचे ध्येय होते. त्यासाठी त्यांनी दीर्घकाळ संघर्ष केला, त्याग आणि बलिदान दिले. आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत, त्यामागे त्या पिढीची मेहनत आणि त्याग आहे. आजच्यासमोरील आव्हाने वेगळी आहेत, त्यामुळे आपल्या जबाबदाऱ्याही वेगळ्या आहेत. पुढील ३०-३५ वर्षांत विद्यार्थी जे काही काम करतील, त्याचा परिणाम 'विकसित भारताच्या' प्रवासावर होईल. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना याने देशाचा काय फायदा होईल आणि देशाची कोणती गरज पूर्ण होईल, याचा विचार त्यांनी केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.