

Football
नवी दिल्ली : फुटबॉलच्या मैदानात आपल्या कुटुंबाचे ऋण आणि आजोबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका परदेशी फुटबॉलपटूने मोठे पाऊल उचलले आहे. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात प्रतिनिधित्व केलेला आणि मुंबईशी नाळ असलेला व्यावसायिक फुटबॉलपटू रायन विल्यम्स याने ऑस्ट्रेलियन नागरिकत्व सोडले आहे. तो आता भारताच्या वरिष्ठ राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून खेळण्यास पात्र ठरला आहे.
बंगळुरू एफसीचा कर्णधार असलेल्या ३२ वर्षीय विल्यम्सचे लवकरच भारताकडून पदार्पण होण्याची शक्यता आहे. आगामी एएफसी आशियाई चषक २०२७ च्या पात्रता फेरीत बांगलादेशविरुद्ध तो भारताच्या जर्सीत दिसू शकतो.
रायन विल्यम्सचे भारतीय कनेक्शन त्याच्या आईमुळे आहे, जिचा जन्म मुंबईतील एका अँग्लो-इंडियन कुटुंबात झाला होता. त्याचे आजोबा, लिंकन एरिक ग्रोस्टेट हे मुंबईतील नावाजलेले फुटबॉलपटू होते. त्यांनी तत्कालीन टाटा संघात खेळताना १९५६ च्या संतोष ट्रॉफी राष्ट्रीय स्पर्धेत बॉम्बेचे प्रतिनिधित्व केले होते. विल्यम्सने सांगितले की, त्याचे आजोबा नेहमी त्याला भारतात खेळायला येण्यास सांगायचे. ही प्रक्रिया अत्यंत कठीण होती, पण निर्णय सोपा होता. आजोबांनी सांगितले होते की भारतात खेळ. माझ्या कुटुंबाने यावर खूप विचार केला. राष्ट्रीय संघात पदार्पण करणे हा कोणत्याही खेळाडूसाठी अभिमानाचा क्षण असतो," असे तो सांगतो.
विल्यम्स यापूर्वी २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळला आहे. तो २०२० पासून भारतात खेळत आहे, त्याने बेंगळूरू एफसीमध्ये प्रवेश केला. त्याने आपल्या कुटुंबालाही बंगळूरूला आणले आहे.
रायन विलियम्स भारतीय नागरिकत्व स्वीकारून वरिष्ठ भारतीय संघात खेळण्याचा निर्णय घेणारा, जपानमध्ये जन्मलेल्या इझुमी अराता (२०१२) नंतरचा दुसरा व्यावसायिक फुटबॉलपटू ठरला आहे.
विल्यम्स आणि नेपाळमध्ये जन्मलेला डिफेंडर अबनीत भारती यांना या महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या एएफसी आशियाई कप पात्रता सामन्यापूर्वी बेंगळुरू येथे होणाऱ्या वरिष्ठ पुरुषांच्या भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या शिबिरात बोलावण्यात आले आहे. दरम्यान, विल्यम्सच्या बाबतीत काही औपचारिकता अजून पूर्ण करायच्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळालेले नाही. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.