

Harmanpreet Kaur:
भारतीय महिला क्रिकेट संघानं दक्षिण अफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत वनडे वर्ल्डकप जिंकला. भारतीय महिला क्रिकेट संघाचा हा पहिलाच वर्ल्डकप असल्यानं देशभरात जल्लोषाच वातावरण आहे. मात्र भारतीय संघानं ही ऐतिहासिक कामगिरी करून एक दिवसही उलटत नाही तोपर्यंत भारताच्या माजी कर्णधार शांता रंगस्वामी यांनी हरमनप्रीत कौरबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं.
शांता रंगस्वामी पीटीआयशी बोलताना सांगितलं की हरमनप्रीत कौरनं आता संघाचं कर्णधारपद सोडलं तर बरं होईल. ती संघासाठी अजूनही एक महत्वाची फलंदाज आहे. तसंच ती अजूनही उत्तम क्षेत्ररक्षण करू शकते. हा बदल संघाच्या दीर्घकालीन हितासाठी घेण्यात यावा असं देखील रंगस्वामी म्हणाल्या. आता पुढचा महिला वनडे वर्ल्डकप हा २०२९ मध्ये होणार आहे. तर टी २० वर्ल्डकप हा पुढच्या वर्षी युकेमध्ये होणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार स्मृती मानधना ही सध्या २९ वर्षाची आहे. ती हरमनप्रीतच्या जागी संघाचं नेतृत्व करू शकते असं मत शांता रंगस्वामी यांनी व्यक्त केलं. त्या म्हणाल्या, 'हरमनप्रीत एक फलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणून अजूनही उत्तम आहे. मात्र रणनितीच्या दृष्टीकोणातून ती अजूनही अडखळते. जर तिच्या खांद्यावरून कर्णधारपदाचं ओझं कमी केलं तर ती अजून चांगली कामगिरी करू शकते. नक्कीच तिच्या नेतृत्वाखाली भारतानं वर्ल्डकप जिंकला आहे. त्यानंतर तिच्याबद्दल असं बोलणं योग्य पद्धतीनं घेतलं जाऊ शकत नाही. मात्र भारतीय क्रिकेटच्या आणि हरमनप्रीत कौरच्या स्वतःच्या भल्यासाठी मला वाटतं की कर्णधारपदाशिवाय ती एक फलंदाज म्हणून चांगलं योगदान देऊ शकते.
रंगस्वामी पुढे म्हणाल्या, 'हरमनप्रीत अजून तीन ते चार वर्षे क्रिकेट खेळू शकते. मात्र जर ती कर्णधारपदावर कायम राहिली तर मात्र ते शक्य होणार नाही. स्मृतीला आता सर्व फॉरमॅटची कर्णधार करायला हवं. तुम्ही आगामी वर्ल्डकप स्पर्धेसाठी देखील प्लॅनिंग केलं पाहिजे.
रंगस्वामी यांनी याबाबतीत रोहित शर्माचं उदारहण दिलं. निवडसमितीनं रोहितच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉ़फी जिंकूनही भविष्याचा विचार करत त्याला कर्णधारपदावरून हटवलं. रंगस्वामी यांनी महिला क्रिकेटमध्ये भारताला जर ऑस्ट्रेलियासारख्या संघाला तगडं आव्हान निर्माण करायचं असेल तर आपल्या गोलंदाजीवर अजून काम केलं पाहिजे असही सांगितलं.