

ravindra jadeja record he become longest streak as the number 1 all rounder in test history
दुबई : एकीकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा 20 जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी जाहीर होणाऱ्या संघावर खिळल्या आहेत, तर दुसरीकडे टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने कसोटीत एक नवा इतिहास रचला आहे. जड्डूने असा पराक्रम केला आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापूर्वी कोणताही खेळाडू करू शकला नाही.
रवींद्र जडेजा हा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणला जातो. तो कसोटी अष्टपैलू क्रमवारीत बऱ्याच काळापासून नंबर-1 स्थानावर आहे. त्याने 2022 मध्ये 9 मार्च रोजी जाहीर झालेल्या आयसीसी कसोटी अष्टपैलू क्रमवारीत नंबर-1 स्थान मिळवले होते, त्यानंतर त्याने आतापर्यंत 1152 दिवस हे स्थान कायम ठेवले आहे. यासह, तो कसोटी क्रिकेटमध्ये इतक्या दिर्घ काळासाठी नंबर-1 स्थानावर राहणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे.
सध्या, जडेजाच्या खात्यात 400 रेटिंग जमा आहेत. त्याच्यानंतर बांगलादेशचा खेळाडू मेहदी हसन मिराज (327 रेटिंग) याचा क्रमांक लागतो. तो दुसऱ्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत जडेजा टॉप-10 मध्ये असणारा एकमेव भारतीय आहे. त्यानंतर अक्षर पटेल 220 रेटिंग मिळवून 12 व्या क्रमांकावर आहे.
जडेजाने आतापर्यंत 80 कसोटी सामन्यांमध्ये 34.74 च्या सरासरीने 3370 धावा केल्या आहेत. तर डावखु-या फिरकीच्या जोरावर त्याने 24.14 च्या सरासरीने 323 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, त्याने आयसीसी एकदिवसीय अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत टॉप 10मध्ये एन्ट्री केली आहे. तो 220 रेटिंगसह नवव्या स्थानावर पोहोचला आहे.