

Rohit Sharma Viral Video: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज राहित शर्मा आपल्या शांत, विनोदी आणि चाहत्यांशी मैत्रीपूर्ण वागणुकीसाठी ओळखला जातो. मात्र, नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये तो त्याच्या बॉडीगार्डला मागे ढकलताना दिसत आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई विमानतळावरील हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये रोहित शर्मा टी-शर्ट, ट्राउझर, कॅप आणि चष्मा परिधान करून विमानतळावरून जाताना दिसतो. यावेळी त्याचे लक्ष मागे उभ्या असलेल्या काळ्या टी-शर्टमधील बॉडीगार्डकडे जाते. त्यानंतर रोहित त्याला खांद्याला धरून थोडेसे मागे करतो आणि काहीतरी सांगताना दिसतो.
व्हायरल व्हिडिओसोबत केलेल्या दाव्यांनुसार, काळ्या टी-शर्टमधील व्यक्ती रोहित शर्माचा बॉडीगार्ड असल्याचे सांगितले जात आहे. चाहत्यांना रोहितजवळ येण्यापासून तो रोखत होता. मात्र, रोहितने त्याला बाजूला करत स्वतः चाहत्यांसोबत फोटो काढून घेतले. यानंतरही विमानतळाच्या आत जाताना रोहित त्या व्यक्तीशी बोलताना दिसतो. त्यामुळे हा प्रकार रागातून नसून चाहत्यांना भेटण्याच्या उद्देशाने झाल्याचे अनेकांचे मत आहे.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी चाहत्यांबद्दल रोहितचा आदर आणि प्रेम पाहून त्याचे कौतुक केले. तर काहींनी बॉडीगार्डशी अशा पद्धतीने वागणे योग्य होते का, असा प्रश्न उपस्थित केला.
मात्र व्हिडिओमध्ये कोणताही वाद किंवा आक्रमकता दिसून येत नसल्याने हा फक्त परिस्थिती हाताळण्याचा एक प्रकार असल्याचेही अनेकांचे मत आहे.
माहितीनुसार, रोहित शर्मा मुंबईहून दिल्लीला पोहोचला आहे. यावर्षी त्याला देशाच्या चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यासंदर्भातील कार्यक्रमासाठी तो दिल्लीत आल्याची चर्चा आहे.
अलीकडेच अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माने 16, 48 आणि 76 धावा केल्या होत्या. आता त्याचे लक्ष 14 जुलैपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेकडे लागले आहे. चाहत्यांना त्याच्याकडून पुन्हा एकदा मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.