

Rohit Sharma farewell match:
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा पराभव झाला. याचबरोबर भारतानं ऑस्ट्रेलियातील तीन सामन्यांची वनडे मालिका देखील गमावली. भारताच्या दृष्टीकोणातून रोहित शर्माचं अर्धशतक हीच काय ती जमेची बाजू ठरली.
रोहित शर्मानं ओव्हलवरील वनडे सामन्यात ७३ धावांची खेळी केली. त्यानं या खेळीद्वारे आपल्या टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं. रोहितच्या या खेळीमुळं त्याच्याकडे अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे हे अधोरेखित झालं. त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे. मात्र भारतीय संघाचा कोच गौतम गंभीरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो रोहित शर्माच्या फेअरवेल सामन्याबद्दल बोलातना दिसतोय.
भारतानं सामना गमावल्यानंतर संघ हॉटेलमध्ये परतत होता. त्यावेळी रोहित पुढे जात होता. त्यानंतर मागून आलेल्या गौतम गंभीरनं रोहित शर्माकडे पाहून, 'रोहित सर्वांना वाटत होतं की आज तुझा फेअरवेल सामना होता. एक फोटो तर लाव.'
गौतम गंभीर हा निवृत्तीच्या मुद्द्यावरून रोहितला छेडताना दिसला. मात्र गंभीरनं फक्त चेष्टा केली असंच दिसत आहे.
दरम्यान, रोहितचा जवळचा मित्र अभिषेक नायरनं रोहितच्या फलंदाजीबाबत कमेंट केली. तो म्हणाला, 'खेळाडू म्हणून तुम्ही तुमचे मोठे शंभर किंवा द्विशतकी खेळी विसराल. मात्र अशा काही खेळी असतात त्यात तुम्ही फाईट केलेली असते त्या खेळी तुम्ही कधीही विसरू शकत नाही.'
रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरूद्धची आजची खेळी ही धावांसाठी लक्षात ठेवणार नाही. मी त्याला जवळून पाहिलं आहे त्याला आजची ही खेळी खूप समाधान देऊन जाणारी असेल. एक फलंदाज म्हणून तुम्ही ज्यावेळी आव्हानात्मक परिस्थितीत धावा करता त्यावेळी ती खेळी तुम्हाला एक वेगळाच आनंद देऊन जाते. पाटा खेळपट्टीवर ५ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचं देखील तसंच आहे.'