पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma : टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तो आनंदाने जमिनीवर कोसळला. विश्वचषक जिंकल्यानंतर रोहितने अनोख्या पद्धतीने आपला आनंद व्यक्त केला. आयसीसीने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित बार्बाडोसच्या खेळपट्टीवरून तोंडात गवत घालताना दिसत आहे. हे रोहित शर्माच्या सखोल समर्पण आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे ज्याने त्याला संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी प्रेरित केले.
कठोर परिश्रम, समर्पण आणि संघासोबत एकजुटीने भारतीय कर्णधाराला विश्वचषक जिंकण्यात मदत केली. विजयानंतर त्याने बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल मैदानाच्या खेळपट्टीचे आभार मानले. या विजयासह भारताकडे आता दोन टी-20 विश्वचषक विजेतेपदे आहेत. यास संघाने वेस्ट इंडिज आणि इंग्लंडशी बरोबरी साधली आहे.
टी20 विश्वचषकाच्या सर्व 9 आवृत्त्यांमध्ये खेळलेल्या रोहितने संघाला विश्वविजयी बनवल्यानंतर या फॉरमॅटमधूनही निवृत्ती जाहीर केली. भारतीय कर्णधार म्हणाला की, विश्वचषक जिंकणे हे माझे स्वप्न होते. जे आज पूर्ण झाले आहे. भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी ही आनंदाची पर्वणी आहे. टीम इंडियाने आपली ताकद आणि कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. या विजयाचा देशाला नक्कीच अभिमान आहे. पण या नेत्रदीपक समाप्तीनंतर मी आता टी-20 फॉरमॅटला निरोप देत आहे’, असे त्याने स्पष्ट केले.
जेव्हा हार्दिक पंड्याने सामन्यातील शेवटचा चेंडू टाकला तेव्हा रोहित शर्मा मैदानावर कोसळला आणि आनंदाने जमिनीवर हात आपटू लागला. रोहित शर्माला आपले अश्रू अनावर झाले. तिथेच त्याने आनंदाश्रूंना मोकळी वाट करून दिली. थोड्यावेळाने सावरत तो विराटकडे गेला आणि त्याची गळाभेट घेतली. तर हार्दिक पंड्याला मिठी मारून त्याचे चुंबन घेतले.