Rishabh Pant resigns : ऋषभ पंतचा राजीनामा.. LSG चे कर्णधारपद सोडले! IPL 2026 मधील निराशाजनक कामगिरीमुळे घेतला निर्णय

IPL 2026 LSG : लखनौच्या टीमसाठी नव्या नेतृत्वाचा शोध सुरू
Rishabh Pant resigns : ऋषभ पंतचा राजीनामा.. LSG चे कर्णधारपद सोडले! IPL 2026 मधील निराशाजनक कामगिरीमुळे घेतला निर्णय
Published on
Updated on

मुंबई : आयपीएल २०२६ च्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. या खराब कामगिरीची नैतिक जबाबदारी स्वीकारत ऋषभ पंतने लखनौ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तातडीने लागू झाला असून, फ्रँचायझीने पंतची विनंती मान्य केली आहे. लखनौ सुपर जायंट्सने शुक्रवारी, २९ मे रोजी अधिकृतपणे ही माहिती दिली.

लखनौ सुपर जायंट्सने २०२५ च्या लिलावात ऋषभ पंतला २७ कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून आपल्या संघात सामील केले होते. तो या संघासाठी एक 'ड्रीम सायनिंग' होता. मात्र, कर्णधार म्हणून पंतला संघाला प्ले-ऑफच्या फेरीत पोहोचवण्यात अपयश आले. आयपीएल २०२६ च्या हंगामात लखनौचा संघ गुणतालिकेत सर्वात तळाला राहिला. या संपूर्ण हंगामात लखनौच्या संघाने १४ सामन्यांपैकी केवळ चार सामन्यांत विजय मिळवला. २०२५ मधील हंगामातही संघाची कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती, जिथे त्यांना १४ पैकी केवळ सहा सामन्यांत विजय मिळाला होता. अशा प्रकारे, पंतने लखनौचे नेतृत्व केलेल्या एकूण २८ सामन्यांत संघाला केवळ १० विजय मिळवता आले.

लखनौ सुपर जायंट्सने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऋषभ पंतने फ्रँचायझीकडे कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती, जी व्यवस्थापनाने स्वीकारली आहे. केवळ नेतृत्वच नव्हे, तर पंतच्या वैयक्तिक फलंदाजीच्या फॉर्मवरही याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. २०२५ मध्ये त्याने १४ सामन्यांत २६९ धावा केल्या होत्या, तर या वर्षीच्या हंगामात त्याच्या बॅटमधून केवळ ३१२ धावा निघाल्या.

आयपीएल २०२६ मधील संघाच्या घसरणीनंतर संघात बदलाचे संकेत देणारे टॉम मूडी यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ऋषभने स्वतःहून ही विनंती केली आणि आम्ही त्याचा आदरपूर्वक स्वीकार केला आहे. असे निर्णय घेणे कधीही सोपे नसते. कर्णधार म्हणून ऋषभने ड्रेसिंग रूममध्ये दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्याचे ऋणी आहोत. आता आमचे संपूर्ण लक्ष संघाची पुनर्रचना आणि पुढील हंगामासाठी तयारी करण्यावर आहे.

ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्समध्ये असताना त्याने आयपीएल २०२४ मध्ये १३ सामन्यांत ४४६ धावा केल्या होत्या. मात्र, लखनौसाठी खेळताना त्याने २८ सामन्यांत २६.४ च्या सरासरीने आणि १३५.७४ च्या स्ट्राईक रेटने केवळ ५८१ धावा केल्या. या काळात त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली.

आता लखनौ सुपर जायंट्ससमोर नवीन कर्णधार शोधण्याचे आव्हान आहे. संघात मिचेल मार्श, एडन मार्करम आणि निकोलस पूरन यांसारखे अनुभवी खेळाडू उपलब्ध आहेत, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपापल्या देशाच्या संघाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे आता लखनौच्या नेतृत्वाची धुरा कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news