

भारताचा उपकर्णधार ऋषभ पंतला ( Rishabh Pant) इंग्लंडविरुद्ध लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळल्या जाणाऱ्या कसोटीत फील्ड पंचांशी झालेल्या वाद चांगलाच भाेवला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आयसीसीने त्याला डिमेरिट पॉइंट दिला आहे. दरम्यान, पंतने पहिल्या कसोटीत दमदार फलंदाजीचे पदर्शन करत दोन्ही डावात शतक झळकावले. त्याने पहिल्या डावात १३४ धावा आणि दुसऱ्या डावात ११८ धावा केल्या आहेत.
इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या ६१ व्या षटकात मोहम्मद सिराज गोलंदाजी करण्यासाठी आला. षटकाच्या तिसऱ्या चेंडूनंतर बुमराहने पंचांकडे चेंडूबद्दल तक्रार केली. पंचांना चेंडू चेकर (गेज) मध्ये टाकून तो तपासण्यास सांगितले. यानंतर पंचांनी खेळ सुरू ठेवण्यास सांगितले. षटकाच्या पाचव्या चेंडूवर हॅरी ब्रूकने चौकार मारला. यानंतर ऋषभ पंतने दुसऱ्या पंचाकडेही चेंडूबद्दल तक्रार केली. चेंडू पुन्हा एकदा गेज चाचणीत पास झाला; परंतु पंतने रागाच्या भरात पंचांसमोर चेंडू फेकला. गेज चाचणीमध्ये चेंडूचा आकार मोजला जातो. जर आकार वेगळा असेल तर चेंडू बदलला जातो.
खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.८ चे उल्लंघन केल्याबद्दल पंत दोषी आढळला आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणे हा नियमभंग आहे. त्यामुळे शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये पंतच्या नावावर एक डिमेरिट पॉइंट जोडला गेला आहे. २४ महिन्यांत हा त्याचावरील ही पहिलीच कारवाई आहे. पंतने आयसीसी मॅच रेफ्रीजच्या आयसीसी एलिट पॅनेलच्या रिची रिचर्डसनने दिलेली शिक्षा देखील स्वीकारली आहे.
लेव्हल वन गुन्ह्यासाठी किमान शिक्षा म्हणजे अधिकृत फटकार, तर कमाल शिक्षा म्हणजे खेळाडूच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड किंवा एक किंवा दोन डिमेरिट पॉइंट्स. डिमेरिट पॉइंट म्हणजे खेळाडू किंवा संघाच्या बेशिस्तीच्या वर्तनासाठी दिला जाणार दंडात्मक गुण आहे. डिमेरिट पॉइंट्स एका दोन वर्षांच्या कालावधीत संकलित होतात. चार डिमेरिट पॉइंट्स जमा झाले तर ते 2 निलंबन गुणांमध्ये रूपांतरित होतात. निलंबन गुणांमुळे खेळाडूला पुढील एक कसोटी सामना किंवा दोन वनडे किंवा T20 सामन्यांतून निलंबित केले जाऊ शकते.
लीड्स कसोटी एका रोमांचक वळणावर पोहोचली आहे. इंग्लंडला सामन्याच्या पाचव्या दिवशी सामना जिंकण्यासाठी ३७१ धावांची आवश्यकता आहे. तर भारताला जिंकण्यासाठी १० विकेट्सची आवश्यकता आहे. भारताचा दुसरा डाव ३६४ धावांवर आटोपला. आता एकूण आघाडी ३७० धावांची झाली आणि इंग्लंडला ३७१ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.