

पुढारी ऑनलाईन डेस्क : एका क्षणात त्याचे सारं आयुष्य बदललं. तो दिवस होता ३० डिसेंबर २०२२. वार्याच्या वेगाशी स्पर्धा करणार्या त्याच्या कारला पहाटे भीषण अपघात झाला. त्याचे करिअर संपलं, अशी चर्चाही सुरु झाली. मात्र त्याचा केवळ स्वत:वर विश्वास होता. कोणताही चमत्कार होणार नाही, याची त्याला जाणीव होती. जिद्द, आत्मविश्वास आणि प्रयत्नांच्या पराकाष्ठेवर पुन्हा उभे राहत 'चमत्कार' करायचा, असा निर्धार त्याने केला. हाच निर्धार कामी आला. तो पुन्हा एकदा ताठ मानेने मैदानात खेळण्यासाठी उभा राहिला. 2022 साली अपघातानंतर क्रिकेटपासून दूर गेलेल्या ऋषभ पंतने (rishabh pant) २१ सप्टेंबर २०२४ रोजी बांगला देशविरूद्धच्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करत दमदार पुनरागमन केले. आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत त्यांच्याकडून दीर्घ खेळीची अपेक्षा होती. भारताचा डाव सावरण्याचा त्याने प्रयत्न केला;पण मोक्याच्या क्षणी त्याने संयम गमावला आणि बेदकारपणे फटका मारत तो तंबूत परतला. पुन्हा एकदा ३० डिसेंबर हा दिवस ऋषभ पंतसाठी 'बॅड डे' ठरला.
बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसर्या दिवसाअखेर भारताने ५ बाद १६४ धवा केल्या होत्या. फॉलोऑन टाळण्यासाठी टीम इंडियाला १११ धावांची गरज होती. तिसर्या दिवशीच्या खेळात सर्वांच्या नजरात टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत ( rishabh pant ) याच्या खेळीकडे होत्या. मात्र तो २८ धावांवर बाद झाला. संयमाने फलंदाजी करत डाव सावरण्याची वेळ असताना ऋषभ पंत याने केलेल्या बेपर्वा खेळीवर माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी कठोर शब्दात त्याला फटकारले होते. सुनील गावसकर म्हणाले की, "मूर्ख, मूर्ख, मूर्ख! मैदानावर ज्या ठिकाणी दोन क्षेत्ररक्षक आहेत तेथे तू फटका मारतोस. यापूर्वीचा फटका मारताना तू चूकला होतास. यानंतर लगेच अशाच प्रकार फटका मारुन तू तुझी विकेट फेकून दिली आहेस. हा तुझा नैसर्गिक खेळ आहे, असे म्हणता येणार नाही. ज्यावेळी संघाला तुझा संयमाची आणि दीर्घ खेळीची गरज होती त्यावेळी अशा प्रकारचा फटका मारुन तू संघालाच खाली पाडले आहे."
दुसर्या डावातही भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. अवघ्या ३३ धावांवर तीन बळी गेले. कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली तंबूत परतले. अशा आव्हानात्मक परिस्थितीत पंत मैदानावर उतरला. सलामीवीर यशस्वी जैस्वालला त्याने भक्कम साथ दिली. यशस्वी फटकेबाजी करत असताना पंतने आपल्या नैसर्गिक खेळापेक्षा संघाला आवश्यक असणारी संयमी फलंदाजी कायम ठेवली. ३० पेक्षा कमी स्टाईक रेटने त्याने आजवरच्या कसोटी सामन्यातील त्याची सर्वात संयमित फलंदाजीचे प्रदर्शन केले. १०४ चेंडूत ३० धावा त्याने केल्या. मात्र या मालिकेत फलंदाजीवेळी झालेल्या चुकाची पुनरावृत्ती झाली. ट्रॅव्हिस हेडला फटकेबाजी करण्याच्या नादात ऋषभ पंतने मार्शकडे झेल दिला. टीम इंडिया त्याच्याकडून दीर्घकाळ फलंदाजीची अपेक्षा असताना तो तंबूत परतला. ३० डिसेंबर २०२२ रोजी पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. बरोबर दोन वर्षांनी त्याला टीम इंडियासाठी मोठी खेळी करत इतिहास घडविण्याची संधी होती मात्र त्याने बेदरकारणे फटका लगावत ही सुवर्णसंधी गमावली. त्यामुळे ३० डिसेंबर हा दिवस त्याच्यासाठी पुन्हा एकदा बॅड डेच ठरला.