

जयपूर : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (RCB) स्टार वेगवान गोलंदाज यश दयाल याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या गंभीर आरोपाखाली दाखल असलेल्या गुन्ह्यात दयालचा अटकपूर्व जामीन अर्ज जयपूरमधील 'पोक्सो' (POCSO) न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
एनडीटीवीच्या वृत्तानुसार, जयपूर मेट्रोपॉलिटन न्यायालयाच्या न्यायाधीश अलका बन्सल यांनी हा निकाल दिला. उपलब्ध पुराव्यांवरून यश दयालला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचे सकृतदर्शनी सिद्ध होत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणाच्या सुरू असलेल्या तपासात संबंधित खेळाडूचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, या टप्प्यावर त्याला अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
जयपूरच्या सांगानेर सदर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने तक्रारीत म्हटले आहे की, ‘क्रिकेट कारकिर्दीत मदत करण्याचे आमिष दाखवून दयालने मला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर ब्लॅकमेल करून गेल्या अडीच वर्षांपासून जयपूर आणि कानपूरमधील विविध हॉटेल्समध्ये नेऊन माझ्यावर अत्याचार केले.’
पोलिसांनी पीडितेच्या मोबाइलमधील चॅट्स, छायाचित्रे, व्हिडिओ, कॉल रेकॉर्ड्स आणि हॉटेलमधील मुक्कामाचा तपशील यांसारखे तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत.
यश दयालचे वकील कुणाल जैमन यांनी न्यायालयात दावा केला की, दयालने पीडितेची भेट केवळ सार्वजनिक ठिकाणी घेतली होती. तिने स्वतःला सज्ञान असल्याचे भासवले होते आणि आर्थिक अडचणींचे कारण सांगून दयालकडून वारंवार पैशांची मागणी केली होती. तसेच गाझियाबादमध्ये या प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका गुन्ह्याचा संदर्भ देत, दयालला पैशांसाठी ब्लॅकमेल करण्याचा हा एक कट असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. मात्र, न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला.
आपल्या जामीन अर्जात दयालने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘माझ्यावर लावण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार असून मला त्रास देण्यासाठी आणि पैसे उकळण्यासाठी रचलेला हा कट आहे,’ असे त्याने अर्जात म्हटले आहे. आपण एक सन्माननीय खेळाडू असून महिलांच्या एका गटाकडून आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचेही त्याने नमूद केले. तसेच तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्याने न्यायालयाला दिले होते.
पीडितेची बाजू मांडताना सरकारी वकील रचना मान यांनी सांगितले की, आरोपीने अल्पवयीन मुलीला क्रिकेटमधील करिअरचे स्वप्न दाखवून फसवले आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. कायद्यानुसार, अल्पवयीन व्यक्तीने दिलेली संमती ही कायदेशीरदृष्ट्या अवैध मानली जाते, याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.