

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात २६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) ऐतिहासिक 'बॉक्सिंग-डे' कसोटी सामना रंगणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याला एक मोठी वैयक्तिक कामगिरी करण्याची आणि क्रिकेट विश्वात नवा इतिहास रचण्याची संधी मिळणार आहे.
ॲशेस २०२५-२६ मालिकेतील पहिल्या तिन्ही सामन्यांत यजमान ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय मिळवून ३-० अशी अजेय आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा सामना बॉक्सिंग-डेला खेळवला जाणार असून, फॉर्मात असलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर पुनरागमन करणे इंग्लंडसाठी मोठे आव्हान असणार आहे. या मालिकेत आतापर्यंत मिचेल स्टार्कने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असून त्याच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लिश फलंदाज हतबल दिसले आहेत.
मिचेल स्टार्कने ॲशेस २०२५-२६ च्या पहिल्या तीन सामन्यांत १७.०५ च्या सरासरीने एकूण २२ बळी घेतले आहेत. आता बॉक्सिंग-डे कसोटीत स्टार्कला श्रीलंकेचे माजी फिरकीपटू रंगना हेराथ यांना मागे टाकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठण्याची संधी आहे.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात यशस्वी डावखुरा गोलंदाज होण्याच्या शर्यतीत स्टार्क सध्या ४२४ बळींसह दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत रंगना हेराथ ४३३ बळींसह पहिल्या क्रमांकावर आहेत. जर स्टार्कने मेलबर्न कसोटीत १० बळी घेतले, तर तो हेराथ यांना मागे टाकून कसोटी इतिहासातील सर्वात यशस्वी डावखुरा गोलंदाज ठरेल.
रंगना हेराथ (श्रीलंका) : ४३३ बळी
मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) : ४२४ बळी
वसीम अक्रम (पाकिस्तान) : ४१४ बळी
डॅनियल व्हिटोरी (न्यूझीलंड) : ३६२ बळी
चमिंडा वास (श्रीलंका) : ३५५ बळी
रवींद्र जडेजा (भारत) : ३४८ बळी
केवळ डावखुरे गोलंदाजच नव्हे, तर कसोटी क्रिकेटमधील एकूण वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीतही स्टार्क मोठी झेप घेऊ शकतो. सध्या तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत आठव्या स्थानावर आहे. जर त्याने बॉक्सिंग-डे कसोटीत ८ बळी मिळवले, तर तो न्यूझीलंडचे दिग्गज रिचर्ड हॅडली यांना मागे टाकून सातव्या क्रमांकावर पोहोचेल.
विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांमध्ये स्टार्क सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत अव्वल स्थानी महान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा (५६३ बळी) विराजमान आहे.