

australia squad announce for wtc 2025 final and west indies series
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC)च्या अंतिम सामन्यासाठी आणि आगामी कॅरिबियन दौऱ्यासाठी 15 सदस्यीय मजबूत संघाची घोषणा केली आहे. पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर या संघात स्टार अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनने पुनरागमन केले आहे, तर फिरकी गोलंदाज मॅट कुहनेमनचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, शेफील्ड शिल्डच्या अंतिम फेरीतील सर्वोत्तम खेळाडू ब्रेंडन डॉगेटची प्रवासी राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात झाली आहे.
कांगारू संघ पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील WTC च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला भिडणार आहे. हा सामना 11 जूनपासून इंग्लंडमधील लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला जाजाईल. यानंतर, ऑस्ट्रेलियन संघ वेस्ट इंडिजला रवाना होणार आहे. तिथे ते 25 जूनपासून 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळतील.
भारताविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये छाप पाडणाऱ्या सॅम कॉन्स्टासलाही संधी मिळाली आहे. तसेच बीजीटीमध्येच पदार्पण करणारा ब्यू ब्यूस्टर देखील संघाचा भाग आहे. त्याने टीम इंडियाविरुद्ध दमदार पदार्पण केले होते. ब्रेंडन डॉगेट हा संघातील तिसरा तरुण खेळाडू आहे पण त्याचे नाव प्रवासी राखीव खेळाडूंच्या यादीत आहे.
मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज सॅम कॉन्स्टास यांच्यात वाद झाला होता. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली, त्यानंतर पंचांनी हस्तक्षेप करून वातावरण शांत केले होते. जसप्रीत बुमराह आणि सॅम कॉन्स्टास यांच्यात सिडनी कसोटीत वाद झाला होता. या वादाचे कारण म्हणजे, सॅम कॉन्स्टासने उस्मान ख्वाजाला फलंदाजीसाठी जास्त वेळ घेतल्याबद्दल बुमराहने त्याला चिडवून बोलले. बुमराहने त्याला पटकन फलंदाजी करण्यास सांगितले आणि त्यावर सॅम कॉन्स्टासने त्याला प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे वाद निर्माण झाला.
WTC फायनल 11 जून रोजी सुरू होत आहे तर IPL 2025 ची सांगता 3 जून रोजी होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाचे महत्त्वाचे खेळाडू सध्या भारतात IPL 2025 खेळण्यात मग्न आहेत. यात कांगारूंच्या कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स व्यतिरिक्त, मिचेल स्टार्क, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड आणि जोश इंग्लिस या महत्त्वाच्या खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे आता WTC फायनल आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया कसोटी संघाची घोषणा झाल्यानंतर, ते IPL मध्ये खेळतील का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने IPLमध्ये खेळण्याचा किंवा न खेळण्याचा निर्णय खेळाडूंवरच सोपवला आहे. त्यांनी म्हटले आहे की ते खेळाडूंच्या प्रत्येक निर्णयाचे स्वागत करतील.
‘खेळाडूंना भारतात परतायचे आहे की नाही या त्यांच्या वैयक्तिक निर्णयात क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यांना पाठिंबा देईल. उर्वरित आयपीएल सामन्यांमध्ये खेळण्याचा निर्णय घेणाऱ्या खेळाडूंसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची तयारी करण्यासाठी संघ व्यवस्थापन काम करेल. सुरक्षा व्यवस्था आणि सुरक्षिततेबाबत आम्ही ऑस्ट्रेलियन सरकार आणि बीसीसीआयच्या संपर्कात आहोत.’
क्रिकेट ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मॅट कुहनेमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर