

Ravindra Jadeja ODI career : मागील काही महिने विराट कोहली, रोहित शर्मा यांच्याबरोबर टीम इंडियातील अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्या वनडेतील कारकिर्दीवर चर्चा सुरू आहे. मागील काही वनडे मालिकांमधून जडेहाला वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता त्याची वनडेतील कारकीर्दच संपली आहे का, असा सवाल विचारला जात असतानाच, माजी भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
रवींद्र जडेजाची न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड झालेली नाही, तर अक्षर पटेल हा भारताची पहिली पसंती असलेला 'लेफ्ट-आर्म फिंगर स्पिनर' म्हणून समोर आला आहे. वनडे विश्वचषकाला आता अवघे एक वर्ष उरले असताना आणि जडेजा भारताच्या, विशेषतः परदेशातील परिस्थितीमध्ये, नियमितपणे दिसत नसल्यामुळे त्याच्या वनडे क्रिकेटमधील संघातील स्थानाबाबत चर्चा सुरू झाली आहे.
'जिओस्टार'शी बोलताना पुजारा म्हणाला की, रवींद्र जडेजा हा भारतीय संघातील एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू आहे. आता त्याच्या वनडे कारकिर्दीचा हा शेवट असू शकतो, कारण निवडीच्या क्रमवारीत अक्षर पटेल त्याच्या पुढे असल्याचे दिसते.
"मला असेच वाटते, रवींद्र जडेजाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये कायम ठेवायचे असते, तर त्याची निवड व्हायला हवी होती. मला खात्री आहे की, त्याला कदाचित सांगण्यात आले असेल की त्याची निवड होणार नाही, कारण अक्षर पटेल आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये मुख्य अष्टपैलू खेळाडू बनला आहे आणि त्याला अधिक संधी दिल्या जात आहेत."
"रवींद्र जडेजाचे वय पाहता, मला वाटते की संघ व्यवस्थापनाने त्याला सांगितले असावे की, तो आता केवळ कसोटी क्रिकेटचा भाग आहे, त्यामुळे त्याने तिथेच लक्ष केंद्रित करावे. त्याला वनडे क्रिकेटसाठी विचारात घेत नाहीत. त्यामुळे, हा कदाचित त्याच्या कारकिर्दीचा शेवट असू शकतो, कारण त्याने आधीच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मला वाटते की आता त्याला पुढील एकदिवसीय सामन्यांसाठी तरी निवडले जाणार नाही."
जडेजाचे अजूनही भारतीय वनडे संघातील स्थान कायम आहे. विश्वचषकासाठी तो अक्षर पटेलच्या जागी एक पर्यायी खेळाडू ठरू शकतो. कदाचित तो वनडे संघात पुन्हा येणार नाही; पण जर कोणी दुखापतग्रस्त झाले, तर सर्वात आधी ज्याचे नाव डोळ्यासमोर येईल तो रवींद्र जडेजाच असेल. अक्षरनंतर, आघाडीचा पर्याय कोण आहे? सध्या तरी अक्षर पटेल हाच आघाडीचा पर्याय आहे आणि त्याच्यानंतर रवींद्र जडेजा हा एक सुरक्षित पर्याय म्हणून उपलब्ध आहे. जर विश्वचषकापूर्वी अक्षर पटेलला काही दुखापत किंवा अडचण आली, तर रवींद्र जडेजा संघात येईल, असे मत अभिषेक नायरने व्यक्त केले.
न्यूझीलंडविरुद्धची भारताची महत्त्वपूर्ण एकदिवसीय मालिका ४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेमुळे भारतीय संघाला विदेशातील आव्हानात्मक परिस्थितीत दर्जेदार प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल. तसेच, पुढील वर्षी दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या विश्वचषकासाठी सर्वोत्तम संघ-संयोजन निश्चित करण्यासही या मालिकेमुळे मदत होईल.