प्रियांश आर्या.. चतुर आणि संधीचं सोनं करणारा विस्फोटक फलंदाज

Priyansh Arya : परिपक्व, परिस्थितीनुसार फलंदाजी
Priyansh Arya
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब किंग्जच्या प्रियांश आर्याने (Priyansh Arya) धोनीच्या सीएसकेविरुद्धची सुरुवात अत्यंत धडाकेबाज पद्धतीने केली. त्याने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर अप्रतिम अपर-कट मारत षटकार ठोकला. सामन्यातील पहिलाच चेंडू प्रेक्षकांमध्ये पाठवण्याची आयपीएल इतिहासातील ही केवळ चौथी आहे. त्यानंतर प्रियांशने केवळ 42 चेंडूंमध्ये 103 धावा तडकावल्या. यादरम्यान त्याने नऊ षटकार आणि सात चौकारांची आतषबाजी केली.

या शतकी खेळीमुळे तो आयपीएल इतिहासात शतक झळकावणारा केवळ आठवा अनकॅप्ड (राष्ट्रीय संघासाठी न खेळलेला) खेळाडू ठरला. या आकडेवारीवरून प्रियांशच्या खेळीतील विस्फोटकपणा आणि ताकद स्पष्टपणे दिसते. असे असले तरी त्याची ही खेळी केवळ बळावर आधारित नव्हती. ती अधिक विचारपूर्वक आणि परिस्थितीला साजेशी होती, जे आकड्यांपेक्षा जास्त महत्त्वाचे मानावे लागेल.

दिल्ली प्रीमियर लीगमधील आपल्या स्फोटक कामगिरीमुळे प्रियांश आर्यचे नाव प्रकाशझोतात आले. 2024 मध्ये तो या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने 10 सामन्यांत 600 पेक्षा जास्त धावा फटकावल्या, ज्यात दोन शतके आणि चार अर्धशतकांचा समावेश होता. याच स्पर्धेत त्याने फिरकी गोलंदाज मनन भारद्वाजच्या एका षटकांत सलग सहा षटकार ठोकले. प्रियांशची या खेळीची सर्वाधिक चर्चा झाली. त्या सामन्यात त्याने केवळ 50 चेंडूंमध्ये 120 धावा वसूल केल्या. तर आयुष बडोनीसोबत (55 चेंडूत 165) विक्रमी 286 धावांची भागीदारीचा रचली. साउथ दिल्ली सुपरस्टार्झ संघाने 5 बाद 308 धावांचा डोंगर उभा केला.

प्रियांशच्या या धडाकेबाज कामगिरीने आयपीएल स्काऊट्सचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या या प्रतिभेमुळे पंजाब किंग्जने त्याला तब्बल 3.8 कोटी रुपयांना खरेदी केले. या 24 वर्षीय आक्रमक फलंदाजावर केलेली ही एक मोठी गुंतवणूक होती.

प्रियांशने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सलग दोन हंगामांमध्ये दिल्लीसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. 16 डावांमध्ये त्याने एक शतक आणि तीन अर्धशतकांसह एकूण 547 धावा केल्या, यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 172.55 होता. या काळात केवळ तीनच डावात तो एकअंकी धावसंख्येवर बाद झाला.

या जबरदस्त फॉर्मच्या बळावर पंजाब किंग्जने प्रियांशवर विश्वास दाखवला आणि आयपीएलया आपल्या पहिल्याच सामन्यात त्याला सलामीवीर म्हणून संघात स्थान दिले. प्रियांशनेही फ्रँचायझीने आपल्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरवला. त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध 23 चेंडूंमध्ये 204.35 च्या स्ट्राइक रेटने धडाकेबाज 47 धावा केल्या आणि अपेक्षांवर खरा उतरला. मात्र त्यानंतरच्या दोन सामन्यांत त्याची कामगिरी निराशाजनक राहिली (8 आणि 0 धावा). पण तरीही पंजाब किंग्जने डावखु-या ओपनरवरचा विश्वास कायम ठेवला. इतर पर्याय शोधण्याऐवजी त्यांनी प्रियांशच्या क्षमतेवर भरोसा ठेवला. याचा प्रत्यय सीएसकेविरुद्धच्या सामन्यात आला.

PBKS आणि CSK यांच्यातील सामन्यासाठी वापरलेली खेळपट्टी मध्यभागी नव्हती. बाजूला होती. त्यामुळे एका बाउंड्रीचा आकार दुसऱ्याच्या तुलनेत लक्षणीय छोटा होता. अशा परिस्थितीत पंजाब संघाने अंतराने कमी असलेल्या बाउंड्रीच्या दिशेला जास्तीत जास्त धावा काढण्याची रणनीती अवलंबली. पण ती उलटी ठरली. या रणनितीत टॉप ऑर्डरचा बळी गेला. प्रभसिमरन सिंग ऑफ साइडला फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू स्टंपवर आदळल्याने बाद झाला. श्रेयस अय्यर फ्लिक मारताना बोल्ड झाला. मार्कस स्टॉइनिस लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न करताना बाद झाला. तर नेहल वढेराही क्रॉस शॉट मारताना टॉप-एज लागून झेलबाद झाला. अशा प्रकारे कमी अंतराच्या बाउंड्रीचा फायदा घेण्याच्या प्रयत्नात PBKS ने आपली आघाडीची फळी गमावली.

सीएसकेने 8 षटकांतच 5 फलंदाज माघारी पाठवून पंजाब संघाचे कंबरडे मोडले होते. प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर, मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा आणि ग्लेन मॅक्सवेल हे अवघ्या एकअंकी धावसंख्येवर बाद झाले. अशा पडझडीतही प्रियांशच्या फटकेबाजीच्या जोरावर संघाची धावसंख्या 83 पर्यंत पोहचली होती. संघाची टॉप आणि मिडल ऑर्डर तंबूत परतली असतानाही प्रियांश डगमगला नाही. निम्मा संघ बाद होऊनही सीएसकेच्या गोलंदाजांवर अचूक आणि नियोजनबद्ध हल्ला चढवला.

प्रियांशने परिपक्व आणि परिस्थितीनुसार साजेशी फलंदाजी केली. त्याने ऑफ साईड आणि लेग साईडला समतोल राखत शॉट्स निवडले.तसेच चेंडूच्या लाईन व अँगलनुसार आपले फटके अचूक मारले. पंजाब संघाने पॉवरप्लेमध्ये एकूण आठ षटकार आणि सात चौकार लागले. त्यापैकी सहा षटकार हे प्रियांशच्या बॅटमधून आले. त्यातील चार षटकार छोट्या बाउंड्रीच्या दिशेने तर दोन षटकार मोठ्या बाउंड्रीच्या दिशेने ठोकले. त्याने या टप्प्यात सहा चौकारही ठोकले, ज्यातील चार छोट्या आणि दोन मोठ्या बाउंड्रीकडे मारले. हे सगळे त्याने अचूक नियोजन आणि चतुराईने केले, जे त्याच्या फलंदाजीतील परिपक्वता आणि मैदानाच्या आकाराची जाण दर्शवते.

प्रियांशने पॉवरप्लेमध्ये केवळ 19 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत आक्रमक सुरुवात केली. मात्र त्यानंतरच्या 9 चेंडूंमध्ये त्याने फक्त 7 धावा घेतल्या. यादरम्यान त्याने शशांक सिंगसोबत भागीदारी करत संघाच्या डावाला स्थिरता देण्यावर लक्ष केंद्रीत केले होते. या टप्प्यात, म्हणजे 7 ते 10 षटकांदरम्यान, सीमारेषा ओलांडणारे फटके कमी झाले, पण नंतर या जोडीने जबरदस्त पुनरागमन करत केवळ 34 चेंडूंमध्ये 71 धावांची झंझावाती भागीदारी रचली. या टप्प्यातही प्रियांशने आपल्या फटकेबाजीतील चातुर्य दाखवले. त्याने छोट्या बाउंड्रीकडे तीन षटकार ठोकले आणि एक चौकार लगावला. तर मोठ्या बाउंड्रीकडे चार षटकार आणि आणखी एक चौकार मारला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.