Pakistan Cricket : इम्रान खान यांच्या मुलांची मुलाखत PCB ला झोंबली; इंग्लंडचे २ दिग्गज खेळाडू कमेंट्री पॅनेलमधून 'आऊट'!

वनडे मालिकेसाठीच्‍या सहा सदस्यांच्या पॅनेलमधून नासिर हुसेन, मायकल ॲथरटन यांना वगळले
Pakistan Cricket controversy
नासिर हुसैन आणि मायकल आथरटन File Photo
Published on: 
Updated on: 

Pakistan Cricket controversy : माजी पंतप्रधान आणि १९९२ च्या विश्वविजेत्या क्रिकेट संघाचे कर्णधार इम्रान खान यांच्या मुलांची मुलाखत घेणे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला रुचले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय त्रिकोणी मालिकेच्या समालोचन पथकातून (कमेंट्री पॅनेल) इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसैन आणि मायकल आथरटन यांना तडकाफडकी वगळले आहे. पीसीबीने जाहीर केलेल्या सहा सदस्यीय समालोचकांच्या यादीत या दोन्ही दिग्गजांची नावे गायब असल्याने क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

लॉर्ड्स कसोटीदरम्यान रंगला होता वाद

या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तान संघ जेव्हा इंग्लंड दौऱ्यावर गेला होता, तेव्हा ‘स्काय स्पोर्ट्स’ने (Sky Sports) इम्रान खान यांची मुले कासिम आणि सुलेमान खान यांची विशेष मुलाखत प्रसारित केली होती. ही मुलाखत खुद्द मायकल आथरटन यांनी घेतली होती. लॉर्ड्स कसोटीदरम्यान ही मुलाखत प्रसारित झाल्यानंतर पीसीबीने तीव्र आक्षेप घेतला होता.

Pakistan Cricket controversy
Pakistan cricket controversy | पाकिस्तानी खेळाडूंवरील दंडाची तलवार कायम! PCB अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं!

संघाने मैदानातही उतरण्यास दिला होता नकार

राजकीय स्वरूपाच्या या मुलाखतीचा निषेध म्हणून पाकिस्तान संघाने दुपारच्या सत्रात मैदानावर उतरण्यास नकार देण्याची धमकीही दिल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणी पीसीबीने स्काय स्पोर्ट्सकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती, तर पाकिस्तानच्या ‘पीटीव्ही’ (PTV) या वृत्तवाहिनीने या मुलाखतीचे प्रसारण देशात रोखले होते.

मुलाखतीत नेमके काय घडले?

सध्या तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दल बोलताना त्यांच्या मुलांनी गंभीर आरोप केले होते. कासिम आणि सुलेमान यांनी दाव्यात म्हटले होते की, "पाकिस्तान प्रशासन इम्रान खान यांना मारण्याचा प्रयत्न करत आहे." इम्रान खान यांना दिवसातील तब्बल २३ तासांपेक्षा जास्त वेळ एका लहान कोठडीत एकटे ठेवले जात असून तांत्रिक कारणांचे दाखले देत आपल्याला व्हिसा नाकारला जात असल्याचा आरोपही मुलांनी केला होता. मात्र, पाकिस्तान सरकारने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. इम्रान खान यांच्या नातेवाईकांना, वकिलांना किंवा डॉक्टरांना भेटण्यापासून रोखण्यात आलेले नाही, असा दावा सरकारने केला आहे.

Pakistan Cricket controversy
Pakistan Cricket : पाकिस्तानातील राजकीय 'खेळा'त क्रिकेट 'क्लीन बोल्ड'; 'पीसीबी'वर नेमकी कोणती नामुष्की ओढवली?

इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दल चिंता

२०२३ पासून तुरुंगात असलेल्या ७१ वर्षीय इम्रान खान यांची दृष्टी तब्बल ७५ टक्क्यांनी कमी झाल्याचे वृत्त असून त्यांच्या प्रकृतीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जगातील अनेक माजी दिग्गजांनी पाकिस्तान सरकारला पत्र लिहून इम्रान खान यांना तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, २०२४ मध्ये जेव्हा इंग्लंड संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला होता, तेव्हा आथरटन आणि नासिर हुसैन हे दोघेही समालोचन पथकाचा प्रमुख भाग होते. मात्र, एका राजकीय मुलाखतीमुळे थेट दोन माजी आंतरराष्ट्रीय कर्णधारांना कमेंट्री बॉक्समधून बाहेरचा रस्ता दाखवल्याने पीसीबीच्या या निर्णयावर टीका होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news