

Pakistan Domestic Cricket Matches Shifted PCB : पाकिस्तानातील राजकीय पक्षांमधील पराकोटीच्या संघर्षाचा थेट परिणाम आता देशांतर्गत क्रिकेटवर झाला आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील राजकीय संकट आणि तेथील आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) राष्ट्रपती करंडक (प्रेसिडेंट्स ट्रॉफी) स्पर्धांचे सामने इतरत्र हलवण्याचा निर्णय घेतला आहे. शरीफ सरकारने खैबर पख्तूनख्वामध्ये आणीबाणी आणि राज्यपाल राजवट लागू करण्याची घोषणा केल्यानंतर, पीसीबीने पेशावर आणि ॲबोटाबाद (Abbottabad) येथे सुरू असलेले प्रेसिडेंट्स ट्रॉफी ग्रेड-१ चे सामने तातडीने दुसऱ्या शहरांमध्ये हलवले आहेत.
खैबर पख्तूनख्वा प्रांतात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे सरकार होते. या पक्षाशी संबंधित वाढत्या राजकीय तणावामुळे हे स्थित्यंतर करावे लागले आहे. क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, पीसीबीने पेशावरमधील इम्रान खान स्टेडियम आणि ॲबोटाबाद क्रिकेट स्टेडियमवर होणारे सामने आता शेखूपुरा आणि लाहोर येथे हलवले आहेत.
स्पर्धेचा लीग टप्पा अंतिम टप्प्यात असताना अचानक झालेल्या या बदलांमुळे वेळापत्रकाचे नियोजन कोलमडले आहे. मात्र, इतर दोन यजमान शहरांमधील, म्हणजेच इस्लामाबाद आणि रावळपिंडी येथील सामने नियोजित वेळेनुसारच सुरू राहतील.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळाच्या शिफारशींना राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर प्रांतात आणीबाणी जाहीर करण्यात आली. रॉयटर्सशी बोलताना पाकिस्तानचे कनिष्ठ गृहमंत्री तलाल चौधरी यांनी स्पष्ट केले की, या राजकीय घडामोडींदरम्यान खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.सुधारित वेळापत्रकानुसार, १४ ऑक्टोबरपासून शेखूपुरा येथील राणा नावेद अकादमीमध्ये घणी आणि हैदराबाद किंग्समन अकादमी यांच्यात सामना रंगणार आहे. तर सुई नॉर्दर्न गॅस पाईपलाईन्स लिमिटेड (SNGPL) आणि ऑइल अँड गॅस डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (OGDCL) यांच्यातील सामना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमला लागून असलेल्या LCCA मैदानावर हलवण्यात आला असून हा सामनाही १४ ऑक्टोबरपासूनच सुरू होईल.
सध्या सुरू असलेली फेरी लीग टप्प्यातील उपांत्य फेरी असून, सहावी फेरी सोमवारपासून सुरू होत आहे. पीसीबीने अंतिम फेरीचा थरार देखील एक दिवसाने पुढे ढकलला असून, आता हे सामने १९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत.बदललेल्या वेळापत्रकानुसार अंतिम फेरीतील लढतींवरही परिणाम झाला आहे. लाहोरचे LCCA मैदान मार्खोर आयटी सोल्यूशन्स आणि पाकिस्तान टीव्ही यांच्यातील अंतिम फेरीच्या सामन्याचे यजमानपद भूषवणार आहे. इस्लामाबादमधील नॅशनल क्रिकेट ग्राउंडवर हैदराबाद किंग्समन अकादमी आणि स्टेट बँक ऑफ पाकिस्तान आमनेसामने असतील, तर डायमंड क्लब ग्राउंड देखील राजधानीतील इतर सामन्यांसाठी सज्ज आहे.
पारंपरिक केंद्रांच्या पलीकडे जाऊन पाकिस्तानमध्ये देशांतर्गत क्रिकेटचा विस्तार करण्याचा पीसीबीचा प्रयत्न होता. मात्र आता राजकीय संघर्षाचा थेट परिणाम यावर झाला आहे. ॲबोटाबादमध्ये नियमितपणे प्रथम श्रेणी सामने खेळवले जातात; तर नूतनीकरणानंतर तब्बल सात वर्षांच्या विश्रांतीनंतर पेशावरच्या इम्रान खान स्टेडियमवर मागील हंगामात वरिष्ठ पुरुषांच्या देशांतर्गत स्पर्धा झाल्या होत्या. यंदाच्या हंगामात पेशावरला पहिल्यांदाच पाकिस्तान सुपर लीगच्या (PSL) सामन्याचे यजमानपद मिळणार होते. मात्र, पश्चिम आशियातील संकटामुळे लागू केलेल्या इंधन बचतीच्या उपायांमुळे पीएसएलचे सामने शेवटी लाहोर आणि कराचीपुरतेच मर्यादित ठेवावे लागले होते. आता खैबर पख्तूनख्वामधील राजकीय अस्थिरतेने देशांतर्गत क्रिकेटचे वेळापत्रक कसे विस्कळीत केले आहे, हे स्पष्ट होते. यामुळे पीसीबीला स्पर्धेच्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर सामन्यांचे स्थान बदलणे भाग पडले आहे.