

Smriti-Palash Wedding Postponed: भारतीय महिला क्रिकेटमधील स्टार ओपनर स्मृती मंधाना आणि म्युझिक डायरेक्टर–फिल्ममेकर पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत चर्चा सुरू होत्या. 23 नोव्हेंबरला दोघे विवाहबंधनात अडकणार होते. पण स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने हे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले. पण आता त्यांच्या नात्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सोशल मीडियावर अचानक काही स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले आहेत. दावा केला जात आहे की हे स्क्रीनशॉट्स पलाश मुच्छल याच्या इन्स्टाग्राम चॅटचे आहेत. पुढारी न्यूजचे अधिकृत स्रोत याची खात्री देत नाहीत, मात्र इंटरनेटवर या स्क्रीनशॉट्समुळे मोठं वादळ उठलं आहे.
हे स्क्रीनशॉट्स एका महिलेने 'मेरी डी कोस्टा' या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले. त्यात पलाश तिची खूप स्तुती करताना, तिला स्विमिंग, स्पा सेशन आणि मुंबईच्या वर्सोवा बीचवर पहाटे 5 वाजता भेटायला बोलावताना दिसत असल्याचा दावा केला जातो. जेव्हा मेरीने त्यांना स्मृतीसोबतच्या नात्याबाबत प्रश्न केला, तेव्हा पलाशने विषय टाळल्याचं स्क्रीनशॉट्समध्ये म्हटलं जात आहे.
या पोस्टनंतर पलाशवर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. अनेक युजर्सने स्मृतीसाठी सहानुभूती व्यक्त करताना लग्न स्थगित होण्यामागे “खरंच काहीतरी वेगळं कारण आहे का?” असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.
लग्न स्थगित झाल्यानंतर स्मृती मंधानाने अचानक लग्नाचे सर्व फोटो इंस्टाग्रामवरून डिलीट केले. चाहत्यांना हा निर्णय धक्का देणारा वाटला. तिच्या बाजूनं अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
दरम्यान, पलाश मुच्छल याची बहीण पलक मुच्छल हिने इंस्टाग्रामवर लिहून स्पष्ट केलं की,
“लग्न फक्त स्मृतीच्या वडिलांच्या तब्येतीमुळे पुढे ढकलले आहे. कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर करा.”
मात्र सोशल मीडियावर वाढलेला वाद आणि व्हायरल चॅट्स यामुळे चर्चेला आणखी उधाण आलं आहे. सध्या या साऱ्याबद्दल अधिकृत खुलासा ना स्मृतीच्या बाजूने आला आहे, ना पलाशच्या. त्यामुळे चाहत्यांच्या मनात प्रश्न कायम आहेत, लग्न खरंच फक्त तब्येतीमुळे पुढे ढकललं, की नात्यात खरोखर काहीतरी बिनसलं आहे?