

PSL vs IPL Controversy
इस्लामाबाद : पाकिस्तान सुपर लीग (PSL) चा शुक्रवारी अत्यंत शांततेत प्रारंभ झाला. लाहोरमधील गडाफी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लाहोर कलंदर्सने हैदराबाद किंग्समेनचा ६९ धावांनी पराभव केला. मात्र, या सामन्यावेळी स्टेडियममध्ये एकही प्रेक्षक उपस्थित नव्हता.
इंधन बचतीसाठी पाकिस्तान सरकारने कठोर काटकसरीचे उपाय लागू केले आहेत. त्यामुळे PSL उद्घाटन सोहळाही रद्द करण्यात आला. आता केवळ प्रेक्षकच नाहीत, तर खेळाडू आणि समालोचकही संधी मिळताच ही स्पर्धा सोडण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. या सर्व प्रकारामुळे मोहसीन नकवी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) अडचणीत सापडले आहे. PSL सोडून IPL मध्ये गेलेल्या खेळाडूंवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही नकवी यांनी दिला आहे. “होय, दोन ते तीन खेळाडू स्पर्धा सोडून गेले आहेत. आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहोत,” असे त्यांनी सांगितले.
झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानी याने बांगलादेशच्या मुस्तफिजुर रहमानच्या जागी कोलकाता नाईट रायडर्समध्ये प्रवेश केला आहे. इस्लामाबाद युनायटेडने त्याला करारबद्ध केले होते, मात्र त्याने PSL ऐवजी IPL ची निवड केली.
श्रीलंकेचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू दासुन शनाका हा दुखापतग्रस्त सॅम करनच्या जागी राजस्थान रॉयल्समध्ये सामील होणार आहे. शनाका हा PSL मधील लाहोर कलंदर्सचा भाग होता.
चेन्नई सुपर किंग्सने ऑस्ट्रेलियाच्या स्पेन्सर जॉन्सनला नॅथन एलिसच्या जागी संघात घेतले आहे. जॉन्सनने यापूर्वी PSL 2026 साठी क्वेटा ग्लॅडिएटर्ससोबत करार केला होता.
आता खेळाडूंपाठोपाठ समालोचकही PSL सोडून IPL कडे वळण्याची शक्यता आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू निक नाईट याची काही दिवसांपूर्वी PSL कॉमेंट्री पॅनेलमध्ये निवड झाली होती. मात्र, आता त्याची स्टार स्पोर्ट्सच्या IPL कॉमेंट्री पॅनेलमध्येही निवड करण्यात आली आहे. त्यामुळे तो PSL मधून मध्यावरच बाहेर पडण्याची शक्यता आहे.