पुढारी वृत्तसेवा
बहुप्रतिक्षित टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला शनिवार, ७ फेब्रुवारीपासून शानदार प्रारंभ झाला आहे.
न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांचा या स्पर्धेतील पहिलाच सामना पार पडला.
न्यूझीलंडने आपल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला आणि २०२६ च्या विश्वचषक मोहिमेची विजयी सुरुवात केली.
सलामीवीर टिम सेफर्टच्या ४२ चेंडूंतील ६५ धावा आणि ग्लेन फिलिप्सच्या २५ चेंडूंतील ४२ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने १८३ धावांचे कठीण लक्ष्य अवघ्या १७.५ षटकांत गाठले.
या दिमाखदार विजयामुळे न्यूझीलंडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन मोठे विक्रम प्रस्थापित केले आहेत.
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील न्यूझीलंडचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग (Run Chase) ठरला आहे; यापूर्वीचा १६७ धावांचा विक्रम त्यांनी आज मोडीत काढला.
तसेच, टी-२० क्रिकेटमध्ये कोणत्याही देशाने अफगाणिस्तानविरुद्ध केलेला हा आजवरचा सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग ठरला आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ च्या 'गट डी' मध्ये आता किवी संघाचा पुढील सामना यूएई (UAE) विरुद्ध होईल आणि त्यानंतर त्यांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर असेल.