Pakistan New Batting Coach : पाकिस्‍तानी फलंदाजांची 'हाराकिरी'; मालिका सुरू असतानाच नव्या प्रशिक्षकाची घोषणा

द. आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू माईक स्मिथ यांची फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती
Pakistan New Batting Coach
Pudhari
Published on
Updated on

Pakistan New Batting Coach : गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या फलंदाजीचा सातत्याने उडालेला 'बोजवारा' आणि तांत्रिक चुका रोखण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अखेर कठोर पाऊल उचलले आहे. आगामी इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वाच्या कसोटी मालिकेपूर्वी पीसीबीने दक्षिण आफ्रिकेचे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू माईक स्मिथ यांची राष्ट्रीय संघाच्या नव्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यात पाक फलंदाजांचा फियास्को!

पाकिस्तानचा संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. पहिल्या कसोटीत पाकिस्तानला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले, तर दुसऱ्या कसोटीतही संघाची अवस्था बिकट दिसत आहे.बाबर आझमकडे पुन्हा एकदा कर्णधारपद सोपवण्यात आले असले, तरी त्याची बॅट अजूनही शांतच आहे. फलंदाजांच्या याच ढिसाळ कामगिरीमुळे पाकिस्तानला सातत्याने पराभवाचा धक्का सहन करावा लागत आहे. त्यामुळेच पीसीबीला मालिका सुरू असतानाच नव्या प्रशिक्षकाचा शोध घ्यावा लागला.

Pakistan New Batting Coach
Auqib Nabi : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात बुमराहच्‍या जागी जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीला संधी

माईक स्मिथ यांच्यावर का दाखवला विश्वास?

माईक स्मिथ हे 'लेव्हल-४' चे सर्वोच्च मान्यताप्राप्त फलंदाजी प्रशिक्षक असून त्यांना फ्रँचायझी क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. विशेषतः 'पाकिस्तान सुपर लीग'मधील (PSL) अनेक संघांसोबत त्यांनी काम केले असल्याने पाकिस्तानच्या देशांतर्गत खेळाडूंची मानसिकता आणि त्यांच्या त्रुटींची स्मिथ यांना उत्तम माहिती आहे. याच अनुभवाचा फायदा त्यांना या पदासाठीच्या शर्यतीत झाला.

इंग्लंड दौऱ्यापासून संभाळणार जबाबदारी

पीसीबीने दिलेल्या जाहीर जाहिरातीनंतर आलेल्या अर्जांमधून स्मिथ यांची निवड करण्यात आली असून त्यांच्याशी तोंडी करार झाला आहे. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी त्यांना लवकरच अधिकृत मंजुरी मिळून ते पाक संघात दाखल होतील.

Pakistan New Batting Coach
cricket shocker news : हृदयद्रावक..! क्रिकेट सामन्यापूर्वी मैदानावरच प्रशिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

असद शफीक यांच्याकडून स्वीकारणार सूत्रे

माईक स्मिथ हे माजी पाकिस्तानी फलंदाज आणि सध्याचे राष्ट्रीय निवडकर्ते असद शफीक यांची जागा घेतील. शफीक हे सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर अंतरिम फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. स्मिथ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शफीक पुन्हा पूर्णवेळ राष्ट्रीय निवडकर्ता म्हणून आपले काम पाहतील.

इंग्लंड दौरा असणार पहिली परीक्षा

पाकिस्तानच्या फलंदाजांना चांगली सुरुवात मिळूनही मोठ्या धावसंख्या उभा करता येत नव्‍हती. फलंदाजीतील या तांत्रिक त्रुटी दूर करून संघात सातत्य आणण्याचे मुख्य आव्हान स्मिथ यांच्यासमोर असणार आहे.१९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेपासून माईक स्मिथ यांच्या नव्या कार्यकाळाची सुरुवात होणार आहे. परदेशी भूमीवरील कसोटी मालिकेतील आपली खराब कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तान संघासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news