

लाहोर : लाहोर कसोटीच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू सेनूरन मुथुसामी याने ऑस्ट्रेलियन महान क्रिकेटपटू शेन वॉर्नला मागे टाकत, पाकिस्तानमध्ये कसोटीच्या पहिल्या डावात पाहुण्या फिरकीपटूने केलेली सर्वोत्तम गोलंदाजी नोंदवली.
या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने 5 बाद 313 पासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यावेळी मोहम्मद रिझवान (62*) आणि सलमान आगा (52*) नाबाद होते. परंतु, मुथुसामीने (6/117) गोलंदाजीत कहर करत पाकिस्तानचा डाव 380 धावांवर संपुष्टात आणला. या डावात इमाम-उल-हक (153 चेंडूंत 93, 7 चौकार, 1 षटकार), कर्णधार शान मसूद (147 चेंडूंत 76, 9 चौकार, 1 षटकार), रिझवान (140 चेंडूंत 75, 2 चौकार, 2 षटकार) आणि आगा (145 चेंडूंत 93, 5 चौकार, 3 षटकार) यांच्या महत्त्वपूर्ण खेळी झाल्या होत्या.
विस्डेननुसार, मुथुसामीने 1994/95 च्या हंगामात वॉर्नने लाहोर येथे पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 6/136 या पहिल्या डावातील कामगिरीला मागे टाकले आहे.
पाकिस्तानमध्ये कोणत्याही डावात पाहुण्या फिरकीपटूने केलेली सर्वोत्तम कामगिरी वेस्ट इंडिजच्या जोमेल वॉरिकनच्या नावावर आहे, ज्याने 2024-25 मध्ये मुलतान येथे 7/32 अशी नोंद केली होती. तर, मायदेशात पाकिस्तानी फिरकीपटूने पहिल्या डावात केलेली सर्वोत्तम कामगिरी अब्दुल कादिर (9/56) यांच्या नावावर आहे, जी त्यांनी 1986/87 मध्ये लाहोर येथे इंग्लंडविरुद्ध केली होती.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात कर्णधार एडेन मार्करामने (37 चेंडूंत 20, 1 चौकार) रयान रिकल्टनसोबत 45 धावांची भागीदारी केली. या खेळीदरम्यान मार्करामने कसोटी क्रिकेटमध्ये 3,000 धावांचा टप्पाही पूर्ण केला. त्याने 47 कसोटी सामन्यांतील 85 डावांत 8 शतके आणि 13 अर्धशतकांसह 36.30 च्या सरासरीने 3,013 धावा केल्या असून, त्याची सर्वोत्तम धावसंख्या 152 आहे.
पाकिस्तान पहिला डाव : 110.4 षटकात सर्वबाद 378.(इमाम हक 153 चेंडूत 93, सलमान आगा 145 चेंडूत 93, शान मसूद 147 चेंडूत 76, मोहम्मद रिझवान 140 चेंडूत 75). दक्षिण आफ्रिका पहिला डाव : 67 षटकात 6 बाद 216.( टोनी झोर्जी 81, रियान रिकल्टन 71. नोमन अली 4/85, साजिद, सलमान प्रत्येकी 1 बळी).