

ind vs wi 2nd test mohammad siraj most wickets in test 2025
भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने २०२५ या वर्षात सर्वाधिक कसोटी बळी घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या कामगिरीसह तो या वर्षात कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
या विक्रमासह सिराजने झिम्बाब्वेचा गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानीला मागे टाकले आहे. ही कामगिरी त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात केली. विंडिजच्या शाई होपला बाद करून सिराज या वर्षात कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला.
ताज्या आकडेवारीनुसार, दिल्ली कसोटी सामन्यातील दोन्ही डावांत मिळून सिराजने ३ बळी घेतले आहेत. या ३ बळींच्या जोरावर तो २०२५ मध्ये सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. या वर्षातील त्याच्या बळींची संख्या आता ३७ झाली आहे. यासोबतच त्याने ३६ बळी घेतलेल्या मुजरबानीला मागे टाकले.
सिराजने या वर्षात आतापर्यंत ८ कसोटी सामन्यांच्या १५ डावांत ३७ बळी घेतले आहेत. यामध्ये त्याने २ वेळा ५ आणि २ वेळा ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्याची सर्वोत्तम कामगिरी ७० धावांत ६ बळी ही आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुजरबानीने ९ सामन्यांत ३६ बळी घेतले आहेत, ज्यात त्याने ३ वेळा ५ बळी घेण्याची कामगिरी केली आहे.
२०२५ : ३७ बळी (१५ डाव)
२०२४ : ३५ बळी (२५ डाव)
२०२३ : १५ बळी (११ डाव)
२०२२ : १० बळी (८ डाव)
२०२१ : ३१ बळी (१९ डाव)
२०२० : ५ बळी (२ डाव)