

Nicholas Pooran Retires : मागील काही दिवसांपासून जगभरातील विविध देशांमधील दिग्गज क्रिकेटपटूंनी निवृत्ती जाहीर केली आहे. यानंतर आज (दि. १० जून) क्रिकेट विश्वाला आणखी एक धक्का बसला. वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटपटू निकोलस पूरनने वयाच्या २९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आज त्याने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही घोषणा केली.
निकोलस पूरनने इंस्टाग्राम पोस्टमध्येनमूद केले की, खूप विचार आणि चिंतन केल्यानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या खेळाने मला खूप आनंद दिला. हा खेळ अविस्मरणीय आठवणींबरोबरच वेस्ट इंडिजच्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देत राहील. मरून रंगाची जर्सी घालणे, राष्ट्रगीतासाठी उभे राहणे आणि प्रत्येक वेळी मैदानावर पाऊल ठेवताना सर्वकाही देणे, त्या क्षणांचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे. याचा माझ्यासाठी काय अर्थ आहे हे स्पष्ट करणे कठीण आहे. कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करणे हा एक सन्मान आहे जो मी नेहमीच माझ्या हृदयात ठेवेन.’ तुमच्या अढळ प्रेमाबद्दल चाहत्यांचे आभार. तुम्ही कठीण काळात मला साथ दिली. चांगल्या क्षणांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला. या संपूर्ण प्रवासात मला साथ देणारे माझे कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांचे आभार. तुमचे आशीर्वाद आणि पाठिंब्यामुळेच मी या प्रवासात आगेकूच करु शकलाे. माझ्या कारकिर्दीचा हा आंतरराष्ट्रीय अध्याय संपला असला तरी, वेस्ट इंडिज क्रिकेटवरील माझे प्रेम कधीही कमी होणार नाही. मी संघ आणि प्रदेशाला पुढील वाटचालीसाठी यश आणि बळ मिळो अशी शुभेच्छा देतो.'
पूरनने वेस्ट इंडिजसाठी ६१ वन-डे सामने आणि १०६ टी-२० सामने खेळले. वन-डेमध्ये त्याने ३९.६६ च्या सरासरीने १९८३ धावा केला. तर टी-२० मध्ये २६.१५ च्या सरासरीने आणि १३६.४० च्या स्ट्राईक रेटने २२७५ धावा केल्या आहेत. पूरनने वन-डेमध्ये सामन्यात तीन शतके आणि ११ अर्धशतके झळकावली आहेत. तर टी-२० मध्ये १३ अर्धशतके त्याच्यानावावर आहेत. रनने वेस्ट इंडिजसाठी कधीही कसोटी सामना खेळला नाही. पूरनने एकदिवसीय सामन्यातही सहा विकेट्स घेतल्या आहेत. पूरन सर्वात लहान स्वरूपात वेस्ट इंडिजचा कर्णधार देखील राहिला आहे.
पूरनने निवृत्तीचे कारण स्पष्ट केले नसले तरी जगभरातील टी-२० लीग खेळण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला असावा, असे मानले जात आहे. वेस्ट इंडिजचे ड्वेन ब्राव्हो, ख्रिस गेल, आंद्रे रसेल आणि सुनील नारायण यांनीही जगभरातील टी-२० लीग खेळण्यासाठी निवृत्ती जाहीर केली हेती. आता पूरन जगभरातील विविध लीग खेळत राहिल. सध्या टी-२० मधील स्टार फलंदाजांपैकी एक अशी त्याची ओळख आहे. फ्रँचायझी त्याला त्यांच्या संघात समाविष्ट करण्यास उत्सुक आहे.