FIFA World Cup 2026 : पोराला वाचवण्यासाठी जर्सी-बुट विकले.. आता जर्मनीला रडवले! गोलकीपर ‘ओरलँडो गिल’ बनला पॅराग्वेचा ‘महानायक’

१२० मिनिटांचा थरार आणि पेनल्टी शूटआऊटमध्ये अभेद्य भिंत बनून उभा राहिलेला एक 'खंदा पिता'; बलाढ्य जर्मनीला नमवून पॅराग्वेचा ऐतिहासिक विजय.
Orlando Gill: From Sacrifice to Paraguay's FIFA World Cup Hero
Published on
Updated on

डॅलस : ‘फुटबॉल फक्त खेळ नाही, तर तो आयुष्य बदलणारं एक माध्यम आहे,’ याची प्रचिती देणारी एक अत्यंत भावूक आणि प्रेरणादायी कहाणी सध्या फिफा विश्वचषकातून समोर आली आहे. कधीकाळी मुलाच्या उपचारासाठी स्वतःचे बूट आणि जर्सी विकायला लागलेला पॅराग्वेचा गोलकीपर ओर्लांडो गिल (Orlando Gill) आज एका रात्रीत संपूर्ण जगाचा हिरो बनला आहे.

विश्वचषकाच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात बलाढ्य जर्मनीविरुद्ध दोन पेनल्टी शूटआऊट रोखत ओर्लांडो गिलने पॅराग्वेला थेट 'राऊंड ऑफ १६' मध्ये पोहोचवले आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतर संपूर्ण क्रीडा जगतातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

फिफा विश्वचषक २०२६ मधील 'राउंड ऑफ ३२' च्या सामन्यात जेव्हा बलाढ्य जर्मनीचा सामना पॅराग्वेशी झाला, तेव्हा गिल हा खेळाडू या सामन्याचा खरा महानायक ठरेल, असा अंदाज कोणीही वर्तवला नव्हता. पॅराग्वेचा २६ वर्षीय गोलरक्षक ओरलँडो गिल जर्मनीविरुद्ध एका भक्कम भिंतीसारखा उभा राहिला. निर्धारित आणि अतिरिक्त वेळेत हा सामना १-१ असा बरोबरीत सुटल्यानंतर, पॅराग्वेने पेनल्टी शूटआऊटमध्ये जर्मनीचा ४-३ ने पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. जर्मन स्ट्रायकर्ससमोर एखाद्या अभेद्य किल्ल्यासारखा उभा राहिलेला गिल या विजयाचा मुख्य शिल्पकार ठरला.

जर्मनीचा 'राउंड ऑफ १६' चा मार्ग रोखला

पेनल्टी शूटआऊटमधील गिलची कामगिरी जेवढी कौतुकास्पद होती, तेवढाच त्याचा मैदानातील १२० मिनिटांचा खेळही थक्क करणारा होता. सामन्यादरम्यान गिलने जर्मनीचे अनेक उत्कृष्ट गोलचे प्रयत्न हाणून पाडले. सामन्याच्या ४२ व्या मिनिटाला ज्युलिओ एन्सिसोने गोल करून पॅराग्वेला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर ५४ व्या मिनिटाला जर्मनीच्या काई हाव्हर्टझने गोल करत सामना १-१ अशा बरोबरीत आणला. पुढील ६६ मिनिटांत दोन्ही बाजूंनी आक्रमक चढाया झाल्या, मात्र गिलच्या चपळाईमुळे जर्मनीला आघाडी घेता आली नाही.

फुटबॉलपटू आधी एक 'खंदा पिता'

ओरलँडो गिलचा खरा संघर्ष फुटबॉलच्या मैदानावर नाही, तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात होता. एक यशस्वी खेळाडू बनण्यापूर्वी तो एक कर्तव्यदक्ष आणि निःस्वार्थी पिता आहे. आपल्या मुलाच्या जन्माच्या वेळी उद्भवलेल्या वैद्यकीय उपचारांचा खर्च भागवण्यासाठी या २६ वर्षीय खेळाडूने आपले बूट, सरावाचे साहित्य आणि अगदी आपली 'पॅराग्वे अंडर-२०' ची जर्सीदेखील विकली होती. कौटुंबिक संकटाशी आणि गरिबीशी दोन हात करत त्याने हा टप्पा गाठला आहे. आज २०२६ मध्ये तो पॅराग्वेच्या ऐतिहासिक विश्वचषक विजयाचा नायक बनला आहे. प्रतिकूल परिस्थिती आणि त्यागाचे रूपांतर कष्टाच्या जोरावर वैभवात कसे करता येते, याचे गिल हे उत्तम उदाहरण आहे. फुटबॉल विश्वासाठी आणि क्रीडाप्रेमींसाठी त्याचा हा प्रवास कमालीचा प्रेरणादायी ठरला आहे.

ओरलँडो गिलची क्लब आणि आंतरराष्ट्रीय कारकीर्द

२६ वर्षांचा ओरलँडो गिल सध्या 'सॅन लोरेन्झो डी अल्माग्रो' या क्लबचे प्रतिनिधित्व करतो. पॅराग्वेच्या राष्ट्रीय संघासाठी खेळलेल्या १० सामन्यांपैकी जर्मनीविरुद्धचा हा विजय त्याच्या कारकिर्दीतील सुवर्णक्षण ठरला आहे. त्याने आपल्या क्लबसाठी एकूण २२ सामने खेळले असून, २०२६ मध्ये अर्जेंटाइन प्रिमेरा अमेरिकामध्ये तो १५ वेळा मैदानात उतरला आहे. यापूर्वी २०२० मध्ये त्याने 'स्पोर्टिव्हो सॅन लोरेन्झो' कडून काही सामने खेळले होते, त्यानंतर २०२३ च्या उत्तरार्धात तो 'सॅन लोरेन्झो डी अल्माग्रो' मध्ये सामील झाला. चालू फिफा विश्वचषकात पॅराग्वेच्या 'ग्रुप डी' मधील सर्व सामन्यांमध्ये तो अंतिम अकरामध्ये खेळला असून, दोन सामन्यांत त्याने प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करू दिला नाही. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात चार गोल पत्करावे लागल्यानंतरही, त्याने खचून न जाता ऑस्ट्रेलिया आणि तुर्कीविरुद्धच्या सामन्यात अभेद्य कामगिरी केली.

पॅराग्वेची पुढील वाटचाल कुठपर्यंत?

उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी पॅराग्वेचा पुढील सामना आता फ्रान्स किंवा स्वीडन यांच्यातील विजेत्या संघाशी होईल. यापूर्वी २०१० च्या विश्वचषकात पॅराग्वेने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती, जिथे त्यांना अंतिम विजेत्या स्पेनकडून १-० असा पराभव स्वीकारावा लागला होता. यंदा पॅराग्वेचा संघ त्याहून पुढे मजल मारणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. हे आव्हान कठीण असले तरी गिलच्या फॉर्ममुळे ते अजिबात अशक्य नाही.

विश्वचषकावर कोण कोरणार नाव?

'राउंड ऑफ १६' मधील संघ निश्चित होण्यापूर्वी 'राउंड ऑफ ३२' चे अजून १२ सामने शिल्लक आहेत. ४८ संघांपासून सुरू झालेला हा महासंग्राम लवकरच आठ, चार आणि अखेर अंतिम सामन्यासाठी दोन संघांवर येऊन पोहोचेल. यंदा फुटबॉल जगताला एखादा जुनाच विजेता मिळणार की नवा इतिहास रचला जाणार, हे येणारा काळच ठरवेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news