

दिल्ली : पोलंडमध्ये शुक्रवारी झालेल्या ऑर्लान जानूझ कुसोझिंस्की मेमोरियल स्पर्धेत भालाफेकमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा जर्मनीच्या ज्युलियन वेबरच्या मागे दुसऱ्या स्थानावर राहिला. या स्पर्धेत नीरज फॉर्ममध्ये दिसला नाही. अंतिम फेरीपूर्वी तो तिसऱ्या स्थानावर होता. सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात ८४.१४ मीटर भाला फेकल्याने त्याने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.
दोहा डायमंड लीगमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करणारा नीरज पोलंडमध्ये त्याची पुनरावृत्ती करू शकला नाही. ज्युलियन वेबरने येथेही नीरजला मागे टाकले आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपले वर्चस्व कायम ठेवले. वेबरने ८६.१२ मीटर भाला फेकून विजेता ठरला. नीरजचे सहा पैकी तीन प्रयत्न फाऊल घोषित झाले आणि शेवटच्या प्रयत्नात त्याने पुनरागमन केले. दोन वेळा विश्वविजेता राहिलेला ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स ८३.२४ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह तिसऱ्या स्थानावर राहिला. दोहामध्येही तो तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता.
नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात फाउल केला. दुसऱ्या प्रयत्नात नीरजने पुनरागमन केले. खराब सुरुवातीनंतर, नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८१.२८ मीटर भाला फेकला. नीरजने पहिल्या तीनमध्ये प्रवेश केला. तिसऱ्या प्रयत्नात नीरजने पुन्हा फाउल केला. नीरज सातत्याने तिसऱ्या स्थानावर राहिला. ज्युलियनने पहिल्यापासूनच आपली आघाडी कायम ठेवली होती. चौथ्या प्रयत्नातही नीरजची निराशाजनक कामगिरी सुरूच राहिली आणि त्याने पुन्हा एकदा फाऊल केला. पाचव्या प्रयत्नात ८१.९० मीटर फेकून अव्वल तीनमध्ये स्थान मिळवले. नीरजने त्याच्या सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात ८४.१४ मीटर फेकले, जे स्पर्धेतील त्याचे सर्वोत्तम फेक होते. या स्पर्धेत नीरजला ८४ मीटरचा टप्पा ओलांडता आला नाही, परंतु तो तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचण्यात यशस्वी झाला.
भुवनेश्वर येथे २०२४ च्या फेडरेशन कपमध्ये ८२.२७ मीटरच्या प्रयत्नानंतर नीरजची ८५ मीटरपेक्षा कमी अंतर भाला फेकण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोहा डायमंड लीगमध्ये त्याने ९०.२३ मीटर अंतरापर्यंत भालाफेक केली. ९० मीटरपेक्षा जास्त अंतर कापण्याची ती पहिलीच वेळ होती.